गझलगायनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष
गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांची पहिली गझल मैफल सन १९७२ साली अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी गेली ५० पन्नास वर्षे अथकपणे महाराष्ट्रासह देश-विदेशात गझल गायनाचे कार्यक्रम केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना करून आतापर्यंत १० अखिल भारतीय गझल संमेलने आयोजित केली, अनेक गझल लेखन कार्यशाळा घेतल्या, वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले, अनेकांना लिहिते-गाते केले, तसेच अनेक नवोदित गझलकारांच्या गझल संग्रहांचे प्रकाशन केले.
आपल्या कार्याद्वारे त्यांनी आपल्या गझलगायनाला चळवळीचे स्वरूप दिले. आपल्या वयाच्या अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या गझलेवरील निस्सीम प्रेमाचा गौरव करण्याच्या उद्देशानेच नेहरू सेंटरने ‘शब्द सुरांची भावयात्रा’ या सुवर्णमहोत्सवी मैफिलीचे आयोजन केले आहे.
चाहत्यांना नव्या रचना ऐकण्याची सुवर्णसंधी
‘शब्द सुरांची भावयात्रा’ या सुवर्णमहोत्सवी मैफिलीत गझलनवाझ पांचाळे हे ‘अंदाज आरशाचा’, ‘आयुष्य तेच आहे’, ‘तू नभातले तारे माळलेस का तेव्हा’, ‘मी किनारे सरकताना पाहिले’, ‘हा असा चंद्र’ अशा अनेक लोकप्रिय गझलांसह नव्या गझलाही सादर करतील. तसेच मुंबईकर रसिकांना आपली आवडती गझल ऐकण्याची फर्माईशही या कार्यक्रमात करता येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध
पांचाळे यांच्या गझलगायनाची ही सुवर्णमहोत्सवी मैफल असल्याने हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे. सोमवार दिनांक १३ मार्चपासून सकाळी १०.३० वाजल्यापासून वरळीतील नेहरू सेंटरच्या तिकीट खिडकीवर या कार्यक्रमासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
गझलनवाझ पांचाळे यांच्या मैफिलीत गिरीश पाठक (तबला), सुधाकर अंबुसकर (हार्मोनियम), संदीप कपूर (गिटार), अब्रार अहमद (संतूर), इक्बाल वारसी (व्हायोलिन) हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. तर, रवींद्र वाडकर हे या मैफिलीचे सूत्रसंचाललन करणार आहेत.