अनिल झगडे हे सकाळी १० वाजता कामासाठी रानात गेले होते. ते दुपारपर्यंत घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचा शोधाशोध सुरू केली, यावेळी ग्रामस्थांना शोध घेत असताना या वणव्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे दिसले. त्यानंतर या सगळ्या घटनेची खबर लाडघरचे पोलीस पाटील प्रमोद म्हादू पवार यांनी दापोली पोलिसांना दिली आहे. दापोली पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन अहवालानंतर अनिल झगडे यांचा वणव्यात होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, या वणव्यामुळे लाडघर परिसरातील वनसंपदेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये जंगली वृक्ष आणि वन्यजीवांची हानी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा वणवा लागल्याचे परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी फवारणी यंत्रासह धाव घेतली. परिसरामध्ये आंबा आणि काजूच्या मोठ्या बागाही आहेत. शर्थीचे प्रयत्न करून नागरिकांनी या बागा वाचवल्या आहेत. मात्र अनिल झगडे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल झगडे हे उत्तम रिक्षाचालक होते. मुंबईत असतानाही त्यांचा रिक्षाचा व्यवसाय होता. झगडे यांच्या आईचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे गावी घरी वडील एकटे असल्याने मुंबई सोडून हे कुटुंब गावी स्थायिक झाले होते. गावी आल्यावरही अनिल झगडे यांचा रिक्षाचा व्यवसाय सुरू होता. अनिल झगडे यांच्या पश्चात पत्नी, वडील, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.