श्याम देशपांडे यांचा राजकीय प्रवास
श्याम देशपांडे हे १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. नंतरच्या काळात १९९९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक होते. देशपांडे शिवसेनेच्या तिकिटावर कोथरूडमधून निवडून आले होते. ते २०००-२०१२ या कालावधीत नगरसेवक होते. तर २००८-०९ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. श्याम देशपांडे यांच्या पत्नीही २०१२ आणि २०१७ अशा दोन टर्म नगरसेविका होत्या. कोथरूड परिसरामध्ये देशपांडे यांचा चांगला जनसंपर्क असल्याने त्याचा आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला फायदा होऊ शकतो. मात्र भाजप आता देशपांडे यांना कोणती जबाबदारी देणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे.
देशपांडे यांची का झाली होती शिवसेनेतून हकालपट्टी ?
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेनंतर श्याम देशपांडे यांनी पत्रक काढत म्हटलं होतं की, ‘शिवसेना-भाजपा युती तुटल्याचे अनेक शिवसैनिकांना दु:ख होत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केल्याने क्लेश होत आहे. भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला आहे, अशीच माझी भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे,’ अशी भूमिका श्याम देशपांडे यांनी पत्रकातून मांडली होती.
दरम्यान, श्याम देशपांडे हे २०१७ मध्येच महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवण्यासाठी उत्सुक होते, अशी चर्चा शहरात होती. मात्र राजकीय गणिते जमली नाहीत. त्यामुळे त्यांनी सन २०१७ ची निवडणूक मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी या प्रभाग क्रमांक १२ मधून लढवली. मात्र, या निवडणुकीत ते पराभूत झाले. या निवडणुकीनंतर देशपांडे पक्षात फारसे सक्रिय देखील नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक लावले होते. त्याचवेळी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट झाली आणि ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मात्र भाजपला याचा किती फायदा होईल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.