Maharashtra Politics | विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी बुधवारी मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले. अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आली.

हायलाइट्स:
- निर्लज्जपणाचा कळस गाठलाय
- अजित पवार सभागृहात गैरहजर असलेल्या मंत्र्यांवर संतापले
यावेळी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील अजित पवारांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रात्री दोन-अडीचपर्यंत जागून काम करायची सवय आहे. पण चंद्रकांत पाटील तर रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी तरी सकाळी लवकर उठून सभागृहात आले पाहिजे होते. ज्यांची लक्षवेधी होती त्या मंत्र्यांनीही सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे होते. अनेकदा संसदीय कामकाज मंत्री सभागृहात नसतात. देवेंद्रजी आम्ही तुमच्याकडे सिनिअर म्हणून बघतो. तुम्ही उच्चविद्याविभुषित आहात, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना सांगा, असे अजित पवार यांनी म्हटले. आज आठ लक्षवेधी होत्या, पण सात लक्षवेधी मंत्री सभागृहात नसल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की आलेय. अधिवेशनाचा एक एक दिवस कमी होतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी विधीमंडळ सभागृह व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपंरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात प्रश्न मांडत असतात, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित राहतच नाहीत. हे वारंवार घडत आहे. त्यामुळे लक्षवेधी सूचना वारंवार पुढे ढकल्याची नामुष्की सभागृहावर येत आहे. हे सभागृह योग्य प्रकारे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संसदीय कार्यमंत्री स्वत: अनेकवेळा सभागृहात अनुपस्थित असतात, सभागृहाचे कामकाज करण्यासाठी समन्वय साधण्यात ते कमी पडत आहेत, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
अजित पवार यांचा रौद्रावतार पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे. मी मंत्र्यांचं बिलकूल समर्थन करणार नाही. आज सभागृहात जो प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी सभागृहाला आश्वस्त करतो की, सर्व मंत्र्यांना यापुढे वेळेवर सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.