प्रकाश सुर्वे यांनी त्यांची बाजू मांडताना म्हटलंय की, “मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड इस्पीतळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे.” मात्र, गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही, असे चूकीचे अर्थ काढून अपप्रचार केला जात असल्याने मी हे विस्तृत निवेदन देत आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदार संघात जोमाने सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या धडाक्यामुळे स्वतःच्या राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीयो मॉर्फ करणे खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत, असं प्रकाश सुर्वे म्हणाले. यामधून विरोधकांचे राजकीय नैराश्य दिसून येते. सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी २४ तास लोकांमध्ये राहून काम करणारे लोकप्रतिनीधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.
११ मार्च रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळयानंतर हजारो लोकांच्या गर्दीच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांची रॅली झाली. यावेळी प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणा-या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडिओमध्ये चुकिचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला, अशाप्रकारचे कृत्य हे हा व्हिडिओ बनवणा-यांची महिलांच्या प्रति असलेली ही मानसिकता दाखवून देते, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे हिच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हीच शिकवण अंगी कारली आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.
या बनावट व्हिडिओ प्रकरणात मुंबई पोलिसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य सामोरे येईलच. अशाप्रकारचे व्हिडिओ पसरवून लोकांचे लक्ष विचलित करता येईल. मात्र, लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करत रहावी लागतात. विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील अशी मी अपेक्षा करतो. या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.