त्या रुग्णाचा मृत्यू कोविड आणि H3N2 इन्फ्लुएन्झामुळे या दोन्हीमुळे झाला आहे. किडनीसह त्याचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यातून त्याचा मृत्यू झाला आहे. मुळात त्याने उपचार घेण्यास विलंब केल्याचा आरोपही डॉ. घोगरे यांनी केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा हा विद्यार्थी २ ते ६ मार्च या काळात अलीबागला सहलीला गेला होता. तेथून आल्यानंतर ७ तारखेला त्याने होळीचा सण साजरा केला. १० तारखेला त्याला ताप आणि सर्दी खोकला अशी लक्षणे दिसू लागली. ११ मार्चला सकाळी त्याने त्याच्याच महाविद्यालयातील हॉस्पिटलमध्ये तपासून घेतले. तिथे बाह्यरुग्ण म्हणून उपचार घेतले. त्याला तेथे दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने त्याला नकार दिला. रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात गेला. तेव्हा त्याला पुन्हा दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, छत्रपती संभाजीनगरहून आपले नातेवाईक येत आहेत, असे सांगून त्याने तेव्हाही दाखल होण्यास नकार दिला. शेवटी रात्री रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले. दुसऱ्या दिवशी त्याचे पालक आले. त्यांनी दुपारी नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिथे त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्याला कोविड आणि H3N2 इन्फ्लुएन्झा याचे मिक्स इन्फेक्शन असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. वसतिगृहातील सर्वांची तापसणी करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या कोणालाही संसर्ग आढळून आला नाही. सुमारे ६६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. लक्षणे दिसून आल्यास लगेच तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे, असे डॉ. घोगरे यांनी सांगितले.
प्रशासनाचा खर्च कमी करा; जुन्या पेन्शनच्या मागणीवर हेरंब कुलकर्णींची प्रतिक्रिया
महापालिकाही यासंबंधी सतर्क झाली आहे. शहरातील सर्व रुग्णालयांची बैठक घेण्यात आली. त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांची तापसणी करण्यात यावी, रुग्ण आढळून आल्यास तातडीने महापालिकेला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.