मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहावं, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी तत्कालिन राज्यपालांना चपराक लगावली. या सगळ्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सांगत आता सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण असल्याचं म्हटलं.

महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मविआच्या नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर कडाडून हल्ला चढवला. मी जे घरी बसून केलं ते सुरत-गुवाहाटी-दिल्लीला जाऊनही हे सगळे करु शकत नाही, असा टोला ठाकरेंनी लगावला. एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजपत जा, अशी आजची स्थिती झाल्याचंही ठाकरे म्हणाले.

शिंदे सांगत राहिले आम्हीच शिवसेना… सरन्यायाधीशांचा एक प्रश्न, आणि कोश्यारींची कोंडी झाली!
उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, असं म्हणतात. ती वेळ आज आलीये. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही. सध्याच्या काळात सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण आहे. कारण लोकशाहीच्या तीन खांबांची अवस्था काय झालीये. हे आपण पाहतोय. पत्रकारांच्या हातात ‘कलम’ असायला पाहिजे, आता ‘कमल’ आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला. मोदी म्हणजे देश अशी व्याख्या आता भाजपवाले करु पाहतायेत. मग भारत माता की जय कशाला म्हणता? मोदी जिंदाबाद म्हणा ना… अशा शब्दात ठाकरेंनी भाजपला सुनावलं.

राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करु नये, आपल्या मर्यादेत राहावं, सरन्यायाधीशांनी सुनावलं
मला विकलेली माणसं नको, लढाऊ माणसं हवीत

“त्यावेळीही सांगितलं, दरवाजा उघडा आहे, ज्यांना वाटतं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी गेट आऊट… मला विकलेली माणसं नकोत. मला लढाऊ माणसं हवीत. याच माणसाने (एकनाथ शिंदे) नाटक केलं होतं. भाजप करत असलेला अन्याय मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असं सांगत कल्याणच्या सभेत राजीनामास्त्र काढलं होतं. मग आता काय झालं? तो अन्याय उघड्या डोळ्याने बघू शकत नाही म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?” असा सवालही ठाकरेंनी विचारला.

माझ्यासारख्या अनुभव नसलेल्या माणसाला नेता म्हणून स्वीकारलं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं ते मोठेपण

काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या अनुभव नसलेल्या माणसाला नेता म्हणून स्वीकारलं, हे त्यांचं मोठेपण आहे. आपल्याला ताकदीने निवडणुकांना सामोरे जायचंय. एकत्रित राहून आपली ताकद दाखवून देऊयात, अशा शब्दात त्यांनी मविआ कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली.

अर्थसंकल्पाचं नाव पंचामृत, पण पंचामृत कुणी लस्सीसारखं पीत नाही. थोडं थोडं देतात, पंचामृत द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यावर हात फिरवायचा, असा टोला जाताजाता उद्धव ठाकरे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here