मुंबईतून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानातून प्रवास करणारी एक इंडो-अमेरिकन महिला अचानकपणे चक्कर येऊन पडली आणि रक्तबंबाळ झाली. हजार फूट उंचीवर विमानात सर्व प्रकार घडल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. प्रवाशांना आणि विमानातल्या वैमानिकासह कर्मचाऱ्यांना काय करावं हा प्रश्न पडला. या ठिकाणी असणाऱ्या एअरहोस्टेसने विभागात कोणी डॉक्टर असेल तर पुढे यावं, असं आवाहन केलं आणि मग क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर हर्षद शहा हे धावून पुढे आले.
महिलेच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी झाला होता. पण, डॉक्टर हर्षद शहा यांनी याची तात्काळ तपासणी करत विमानातल्याच दोन प्रवासी महिलांना घेऊन विमानात असणाऱ्या उपलब्ध औषध साधनाच्या आधारे उपचार सुरू केला. पण, रक्तस्त्राव खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन इमर्जन्सी लॅडिंग करावी लागणार का, अशी परिस्थिती देखील निर्माण झाली. त्यामुळे वैमानिकाने आपल्या केबिनमधून बाहेर येत त्याने पुढे असणाऱ्या तेहरान हवाई अड्ड्यावर विमान उतरवायचे का? याबाबत विचारणा केली. पण विमान उतरल्यानंतर पुन्हा दीड दिवस विमान उड्डाण घेऊ शकणार नाही, याची कल्पना देखील डॉक्टर हर्षद शहा यांना दिली.
पण, हर्षद शहा यांनी आपल्याला काही वेळांचा अवधी देण्याची विनंती वैमानिकाला केली आणि शांत आणि संयमाने महिलेवर उपचार सुरू केला. बिझनेस क्लासच्याच एका बेडवर महिलेवर हा शहा यांनी गतीने उपचार सुरू केल्यावर काही वेळातच महिलेने उपचाराला प्रतिसाद दिला. त्यामुळे हर्षद शहा यांच्यासोबत सर्वांच्याच जीवात-जीव आला.
हर्षद शहा यांनी घटनेचे गांभीर्य आणि तातडीने उपचारासाठी उचललेले पाऊल आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या मदतीने विमानात मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेचे प्राण वाचले आणि या सर्व गोष्टीबद्दल उपस्थित विमानातील प्रवाशांनी डॉक्टर हर्षद शहा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन महिलांनी राहून कृतज्ञता व्यक्त केली, तर हजार फूट उंचीवर घडलेला प्रकार विमानातल्या प्रवाशांसाठी थरारक असा प्रसंग ठरला.