नवी दिल्लीः राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आता अखिल भारतीय संत समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना असभ्या भाषेचा प्रयोग केला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री यांनी दिला होता. यावरून हिंदू साधू-संतांच्या अखिल भारतीय संत समितीने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य वारशावर उद्धव ठाकरे यांनी कब्जा केला आहे. उद्धव ठाकरे कॉन्व्हेंट शाळेत शिकलेत. त्यांना काय माहिती व्हर्च्युअल आणि वास्तविक पूजेतला फरक, अशी टीका करताना असभ्य भाषेचा वापर अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस जितेंद्रनंद सरस्वती यांनी केलाय. वडिलांच्या वारशावर पात्रता नसलेला मुलगा बसला आहे. त्याना धर्म- आध्यात्माची भाषा ही राजकारणाचीच भाषा वाटतेय. हे अतिशय दुःखद आहे. इटालियन बटालियनच्या आश्रयाला गेल्याने या पेक्षा वेगळं काय होणार आहे. अपात्र असलेल्या मुलाने वडिलांच्या वारशावर ताबा मिळवला असून राजकीय आणि धर्मिक भाषेची तुलना केली जात आहे. इतरांच्या ( इटालियन बलटालियन ) आश्रयाला गेल्याने अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार, असं सरस्वती म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम राम मंदिराला पाठिंबा दिला, असं म्हणत जितेंद्रनंद सरस्वती यांनी बाळासाहेबांची स्तुती केली. उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे महान व्यक्ती होते. पण उद्धव ठाकरेंचे शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले. यामुळे त्यांना काय कळणार वास्तविक भूमिपूजन आणि व्हर्च्युअल भूमिपूजेतला फरक. भूमिपूजन मातृभूमीला स्पर्श न करता कसे काय पूर्ण होऊ शकते? असा सवाल सरस्वती यांनी केला.

राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला अनेक उद्योगपती ही येणार आहेत. राम मंदिर उभारण्यात त्यांचाही हातभार असणार आहे. आताची अयोध्य ही भविष्यातील भारताची अध्यात्मिक राजधानी असणार आहे. यामुळे भूमिपूजन बदल स्वीकारणं अशक्यच आहे. कार्यक्रमाला अनेक उद्योगपती येणार आहेत. त्यांनी अयोध्येचं रुपडं बदलावं. अयोध्येत राम राज्याची अनुभूती करून द्यावी. हेच या भूमिपूजनाचे उद्दीष्ट आहे, असं सरस्वती म्हणाले.

काशी आणि मथुरेतील मंदिरांबाबतही सरस्वतींनी मत मांडलं. राम जन्मभूमीनंतर कृष्ण जन्मभूमीचाही कायापलट होईल. अयोध्येचं स्वरुप बदलत असताना काशी आणि मथुरा काही वेगळे नाहीत. अयोध्या, काशी आणि मथुरा ही तीन मंदिरं आपल्या हवी आहेत. यासंदर्भात चर्चा होईलच, असं ते म्हणाले. सनातन हिंदू समाज आणि हिंदू समाजाच्या बळकटीसाठी शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने मंदिराची भूमिका काय असेल हे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट निश्चित करेल, असं सरस्वती म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here