st bus news, रस्त्यावर एसटी बस घसरली अन् थेट डंपरला जाऊन धडकली; अपघातात ७ प्रवासी जखमी – st bus and dumper accident near sherbagh on panchgani wai route seven passengers injured
सातारा : पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी-वाई मार्गावर शेरबागजवळ एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय व बेल एअरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यात उभी असल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पर्यटनाला आलेल्या पर्यटकांचे हाल झाले.
या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, पांचगणीहून वाईकडे जाणारी रोहा-सातारा ही निमआराम बस (क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ४९१७ ) शेरबागजवळील उतारावर आली असता नुकत्याच पडलेल्या पावसाने निसरड्या रस्त्यावरून घसरून वाईहून पांचगणीकडे येणारा डंपर (क्रमांक एम. एच. ११ सी. जे. ६२४७ ) वर समोरासमोर आदळली. त्यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बसमध्ये असणाऱ्या २९ प्रवाशांपैकी सहा ते सात प्रवाशांना जखमा झाल्या आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
या घटनेची माहिती मिळताच पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने घटनास्थळी दाखल झाले, तर एसओएस टीमचे सदस्य या ठिकाणी मदतीसाठी धावून आले. यातील जखमींना उपचारासाठी या सदस्यांनी बेल एअर व पाचगणी ग्रामीण रुग्णालयात नगरपालिका व बेल एअरच्या रुग्णवाहिकेतून दाखल केलं.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघातातील दोन्ही वाहने रस्त्यात जागेवरच उभी असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली. त्याचबरोबर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हाल झाले. क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाजूला करण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली.