मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. अनिष्का हिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अनिष्काने अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देऊ करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता ही सगळी माहिती समोर आली आहे.

अनिष्का ही गेल्या दीड वर्षांपासून अमृता फडणवीस यांना ओळखत होती, त्यांच्या संपर्कात होती. अनिष्का एकदा अमृता फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरही येऊन गेली होती. अनिष्का हिने अमृता फडणवीस यांच्याकडे काही बुकींविषयी माहिती मागितली होती. या मोबदल्यात अंकिशा अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपये द्यायला तयारी होती. बुकींच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी आणि वडिलांना एका गुन्हेगारी प्रकरणातून सोडवण्यासाठी अनिष्काने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

अमृता फडणवीस यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या आलेल्या तक्रारीनुसार, अनिष्काने १८ आणि १९ फेब्रुवारीला एका अज्ञात मोबाईल नंबरवरुन त्यांना एक व्हिडिओ क्लीप, मेसेज आणि व्हॉईस नोट पाठवली. त्यानंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांकडून अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे धमकावण्यात आले. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० ब ( कट रचणे), भ्रष्टाचार कायदा १९८८ मधील कलम ८, कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु, अद्याप अनिष्का किंवा तिच्या वडिलांना अटक करण्यात आलेली नाही.
Video- अखेर आलं अमृता फडणवीसांचं गाणं, मॉर्डन ज्वेलरी आणि वेस्टर्न लूकमध्ये तो क्या केहना

नेमकं प्रकरण काय?

अमृता फडणवीस यांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, अनिष्का हिने आपण कपडे, ज्वेलरी, फुटवेअर डिझायनर असल्याचे सांगितले होते. अनिष्काने मला तिने डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये परिधान करण्याची विनंती केली होती. जेणेकरून तिला आपल्या उत्पादनांचे प्रमोशन करता येईल. मला अनिष्काविषयी सहानुभूती वाटली आणि मी तिच्या प्रस्तावाला होकार दिला. अनिष्का मला नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा अनिष्काने तिच्या आईचे निधन झाल्याचे सांगितले. घरात मी एकटीच कमावती व्यक्ती असून मीच घराचा सगळा खर्च चालवत असल्याचे तिने मला सांगितले. अनिष्का ही अनेकदा अमृता फडणवीस यांच्या घरी जायची. तसेच त्यांच्या अमृता यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही हजेरी लावायची.

एकदा ती माझ्या एका कर्मचाऱ्याकडे आली आणि तिने त्याच्याकडे काही डिझायनर कपडे आणि ज्वेलरी दिली. हे कपडे आणि ज्वेलरी मी सार्वजनिक कार्यक्रमात घालावेत, अशी तिची इच्छा होती. ते कपडे मी सार्वजनिक कार्यक्रमात वापरलेत की नाही, हे मला माहिती नाही. ते कपडे मी अनिष्काला परत दिले असावेत किंवा दान केले असावेत. कारण सध्या ते डिझायनर कपडे माझ्याकडे नाहीत, असे अमृता फडणवीस यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटले आहे.
रियाजसोबतच्या त्या रीलमुळे अमृता फडणवीस अडचणीत; गाण्यामुळे नाही तर…
अनिष्काने नोव्हेंबर २०२२ मध्ये अमृता फडणवीस यांना सागर बंगल्यावर एक नेकलेसही भेट दिला होता. परंतु, अमृता फडणवीस यांनी तो नेकलेस कधीच घातला नाही. अनिष्काला वाईट वाटेल म्हणून मी एक-दोन कार्यक्रमांना नेकलेस घातल्याची थाप अमृता फडणवीस यांनी मारली. तीन आठवड्यांनी मी अनिष्काला तो नेकलेस परत केला. यानंतर अनिष्काने एकदा अमृता यांच्याशी बोलताना माझ्या वडिलांचे राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिष्काने अमृता यांच्या घरातील कर्मचाऱ्याच्या हातात एक लखोटा दिला. हा लखोटा अमृता फडणवीस यांना द्या, असे अनिष्काने कर्मचाऱ्याला सांगितले. मी तो लखोटा उघडला तेव्हा त्यावर अनिष्काच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहले होते. ते मला न समजल्यामुळे मी तो लखोटा बाजूला ठेवून दिला. त्यानंतर २७ जानेवारीला पुण्यातील एका कार्यक्रमात अनिष्का अमृता फडणवीस यांना भेटली. अनिष्काला पुण्यात पाहून मला आश्चर्य वाटले. मी तिला विचारणा केली तेव्हा एका कर्मचाऱ्याने तिला कार्यक्रमाचा पास दिल्याचे अनिष्काने सांगितले. या कार्यक्रमावरुन मुंबईला परतत असताना अंगरक्षकाने आमची गाडी थांबवली तेव्हा मला अनिष्का समोर उभे असल्याचे दिसले. अमृता फडणवीसांनी मला भेटायला बोलावले आहे, असे अनिष्काने अंगरक्षकाला खोटे सांगितले. ती खोटं बोलतेय हे माहिती असूनही मी अनिष्काला माझ्या गाडीत बसवून घेतले. कारण मला त्याठिकाणी कोणताही वाद घालायचा नव्हता, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी अनिष्काने अमृता यांना आपल्या वडिलांनी पोलिसांनी काही बुकींविषयी माहिती दिल्याचे सांगितले. या बुकींची माहिती पोलिसांना देऊन पैसे कमावता येऊ शकतात. तसेच या बुकींवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आपल्याला पैसे मिळू शकतात, असे अनिष्काने अमृता फडणवीस यांना सांगितले. हा प्रस्ताव ऐकून अमृता फडणवीस यांनी रस्त्यामध्येच गाडी थांबवून अनिष्काला खाली उतरायला लावले. त्यानंतर अनिष्का मागून येणाऱ्या दुसऱ्या गाडीत बसली. यानंतर अनिष्काने केलेल्या मोबाईल कॉलकडे अमृता फडणवीस यांनी दुर्लक्ष केले.

यानंतर १६ फेब्रुवारी रोजी रात्री साडनेऊ वाजता अनिष्काने अमृता फडणवीस यांना फोन केला. तेव्हा अनिष्काने आपले वडील एका गुन्हेगारी प्रकरणात अडकले असून त्यांना सोडवण्यासाठी मी १ कोटी रुपये द्यायला तयार असल्याचे सांगितले. हे ऐकून अमृता फडणवीस यांनी फोन कट केला आणि तिला ब्लॉक केले. यानंतर अनिष्काने अमृता फडणवीस यांना २२ व्हिडिओ क्लीप्स आणि तीन व्हॉईस नोटस पाठवल्या. या सगळ्या गोष्टी अज्ञात मोबाईल नंबरवरून पाठवण्यात आल्या होत्या. अमृता यांच्या कर्मचाऱ्यालाही तशाच क्लीपस पाठवण्यात आल्या होत्या. हा मोबाईल नंबर अनिष्का हिच्या वडिलांचा असल्याची माहिती मला नंतर कळाल्याचे अमृता फडणवीस यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात शिक्षकांना अच्छे दिन; पगारात भरघोस वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here