नोबेल समितीच्या उपनेत्याने इतके उघडपणे संकेत दिल्यामुळे यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळण्याची शक्यता कैकपटीने वाढल्याची चर्चा आहे. टोजे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया आणि इतर व्यासपीठांवर पंतप्रधान मोदींना नोबेल पुरस्कार मिळणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. नरेंद्र मोदी हे केवळ भारतालाच पुढे नेत नाहीत तर ते जगात शांतता नांदण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भारताकडून सुरु असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील शांततेसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याचे मत टोजे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोबेल मिळण्याची शक्यता जास्त का?
पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर दीर्घकाळ देशाचे पंतप्रधानपद भुषवण्याची किमया नरेंद्र मोदी यांनी साधली आहे. गेल्या नऊ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय राजकारणात एकहाती वर्चस्व राखून आहेत. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वत:चा ठसा उमटवण्यात यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा अनिवासी भारतीय त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्याप्रमाणावर गर्दी करताना दिसतात. अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांशी वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करण्यात पंतप्रधान मोदी यांनी यश मिळवले आहे. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत नरेंद्र मोदी यांनी अनेक आंतराराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. जनधन योजना, उज्ज्वला योजना आणि कोरोना काळातील कामगिरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्य जनतेच्या मनात स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले आहे. या सगळ्यामुळे नरेंद्र मोदी हे आजघडीला भारतातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते आहेत.