आपण फॅशन डिझायनर असल्याचं अनिक्षानं अमृता फडणवीसांना सांगितलं. बऱ्याच वर्षांपासून ती अमृता यांच्या संपर्कात होती. अनिल जयसिंघानी विरोधात दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यासाठी अनिक्षानं अमृता यांच्यावर दबाव टाकल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘अनिक्षा ही २०१५-१६ मध्ये अमृता यांच्या संपर्कात आली. त्यानंतर ती काही कालावधीसाठी संपर्कात नव्हती. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अनिक्षानं अमृता यांच्याशी पुन्हा संपर्क साधला,’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘मी ड्रेस डिझायनर आहे. आर्टिफिशियल दागिन्यांचंही काम करते. मी डिझाईन केलेले ड्रेस,दागिने तुम्ही घाला, असं अनिक्षानं अमृता फडणवीसांना सांगितलं. वडील अनिल यांच्यावर दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यासाठी अनिक्षानं १ कोटी रुपयांची लाच देऊ केली. मात्र अमृता यांनी लाच घेण्यास नकार दिला. त्यामुळे अमृता यांनी तिला ब्लॉक केलं,’ असा घटनाक्रम देवेंद्र यांनी सांगितला.
‘अनिक्षा काही चुकीची कामं करत असल्याचं अमृताच्या लक्षात आलं. त्यामुळे तिनं अनिक्षासोबतचा संवाद बंद केला. त्यानंतर दोन दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून अमृता यांना मेसेज आणि व्हिडीओ आले. त्यातील एका व्हिडीओत अनिक्षा अमृताच्या गळ्यात हार, हातात अंगठ्या घालत होती. दुसऱ्या व्हिडीओत अनिक्षा एका बॅगेत नोटांची बंडलं भरत होती आणि तशाच प्रकारची बॅग ती आमच्या घरात काम करणाऱ्या महिलेकडे देत होती. अनिलविरोधातील गुन्हे रद्द न केल्यास व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी देत तिनं ब्लॅकमेलिंग सुरू केलं. आम्ही ते व्हिडीओ फॉरेन्सिकला पाठवले. अनिक्षानं नोटा भरलेली बॅग आणि तिनं घरात काम करणाऱ्या महिलेच्या हातात दिलेली बॅग वेगळी असल्याचं फॉरेन्सिकच्या अहवालातून समोर आलं,’ असं फडणवीस म्हणाले.