राजधानी साताऱ्यातील माहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती महाराणी येसूबाई यांची समाधीदेखील माहुलीतच आहे. आजपर्यंत अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी प्रयत्न केले. सातारास्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था व संलग्न असणाऱ्या अभ्यासकांनी नुकतेच इतिहासकालीन काही पत्रे व नकाशाच्या आधारे महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थाननिश्चिती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री यांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. १७२९ च्यादरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. त्यानंतरच्या काळात त्यांची घुमटी म्हणजेच समाधी माहुली येथे बांधण्यात आली, असा उल्लेख सापडतो; परंतु पुढच्या जवळपास तीनशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात राजघराण्यातील इतर समाध्यांप्रमाणेच या समाधीचे स्थानदेखील विस्मृतीत गेले. येसूबाईंच्या समाधीचा शोध घेण्याचे काम काही ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी केले होते. त्यात अग्रक्रमाने वा. सी. बेंद्रे यांचे नाव घ्यावे लागेल.
१९९१ ला अहमदनगर वस्तुसंग्रहालयात कार्यरत असणारे सुरेश जोशी यांनी बेद्रे सरांचे मत खोडून काढत संगम माहलीतील छत्रपती शाहू महाराजांच्या लाडक्या श्वानाच्या समाधीसमोर असणाऱ्या एका समाधीकडे निर्देश करत तीच येसूबाईची समाधी असावी असा अंदाज वर्तवला होता. या दोघांव्यतिरिक्त आणखी काही अभ्यासकांनीदेखील समाधीच्या जागेबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली होती. परंतु ठोस पुराव्याअभावी ते सिद्ध होऊ शकले नाही.
२००५ मध्ये जिज्ञासा मंचातर्फे महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे अवशेष शोध मोहीम घेतली. या मोहिमेस सातारचे माजी नगराध्यक्ष दिवंगत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाठबळ लाभले होत. खरंतर तेव्हापासूनच येसूबाईच्या समाधीच्या शोध सुरु झाला. साधारणतः सहा वर्षांपूर्वी माहुलीतील हरिनारायण मठाच्या कागदपत्रात या समाधीचा नामोल्लेख आढळून आला. परंतु त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती. त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांकडून घेतलेली मौखिक माहिती, पुराभिलेखागार कार्यालयाकडून मिळालेले दस्तावेज, तसेच माहुलीच्या हरिनारायण मठाची कागदपत्रे याच्या आधारावर शोध घेण्याचे काम सुरु होत. अखेर काही दिवसांपूर्वीच एका जुन्या नकाशाच्या आधारे समाधीचे स्थान निश्चिती करण्यास यश मिळाले.
संगम माहुली गावात शिरत असतानाच डाव्या बाजूस एक मोठा चौथरा लागतो. या चौथऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे वृंदावन व त्याच्या पाठीमागील बाजूस सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईचा मृत्यू २५ जुलै १७४८ साली झाला. त्यानंतर त्यांच्या समाधीच्या कामास सुरुवात झाली. या समाधीच्या पुढील बाजूस उजव्या हाताला कृष्णा- वेण्णामाईची रयशाळा आहे. याला लागूनच पाठीमागील बाजूस पूर्वाभिमुख एक अवाढव्य बांधकाम दिसते. एका चौरस चौथऱ्यावर अष्टकोनी आकारात हे बांधकाम आहे. त्याच्या चारही बाजूस गोलाकार दगडी खांबांनी ते सुशोभित केले आहे. ही वास्तू अवाढव्य असली तरी पुढे असलेला रथशाळा व आजूबाजूला वाढलेल्या वस्तीमुळे जवळ गेल्याशिवाय दृष्टिपथात येत नाही. या वास्तूचा चौथरा राजचिन्हांनी सजवलेला असून, अतिशय देखण्या स्थापत्यशैलीत तिचे बांधकाम झालेल दिसत.
काळाच्या ओघात वरील घुमटाचे थोडे नुकसान झाले असले तरी आजमितीस जवळपास तीनशे वर्षानंतरही दगडात बांधलेली ही वास्तू दिमाखात उभी आहे. ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराणींची आहे हे सिद्ध झाल्यामुळे सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा दृष्टिपथात आला आहे.
समाधीचा शोध ज्या इनामपत्राच्या आधारावर घेतला गेला. ती माहुलीस्थित हरिनारायण मठाची ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. यात ५ नोव्हेंबर १७५६ सालातील पत्रे आहेत. या पत्राची सुरुवात श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब या नावाने होते. हरिनारायण मठाच्या परिसरात राजघराण्यातील आणखी काही समाध्या असल्यामुळे येसूबाई साहेबांच्या समाधीची स्थाननिश्चिती करण्यास अडचणी येत होत्या. परंतु नुकत्याच एका जुन्या नकाशाच्या आधारावर येसूबाई साहेबांच्या समाधीच्या स्थानावर शिक्कामोर्तब झालं.
महाराणी येसूबाई फाउंडेशन राजधानी सातारा व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था सातारा प्रशासनाच्या माध्यमातून सदर समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. या संशोधनकार्यात सातारचे माजी उपनगराध्यक्ष व महाराणी येसूबाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुहास राजेशिर्के यांच्यासह जिज्ञासा संस्थेचे पदाधिकारी व संलग्न इतिहास अभ्यासकांनी परिश्रम घेतले. तसेच माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडूरंग नेवसे यांचे सहकार्य लाभले.
एकनाथ शिंदेंची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना, शहरात झळकलेलं चित्र पाहून मनसे आमदाराचा संताप