नवी दिल्ली: ‘स्वतः वरील विश्वासच उडाला होता अन् कर्णधारपदासाठी आवश्यक असणारी जिगरही कमी झाली होती, त्यामुळे २०२१च्या आयपीएल मोसमानंतर मी बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या कर्णधारपदावरून पायऊतार झालो’, कोणताही आडपडदा न ठेवता विराट कोहली सांगत असतो. २०१७ आणि २०१९ या मोसमांत तर त्याच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूने गुणतक्त्यात अक्षरशः तळ गाठला होता. २०१९च्या मोसमात तर बेंगळुरूवर सलग सहा लढती गमावण्याची नामुष्की आली होती.

२०२१च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मोसमात विराटने भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडले. अन् त्यानंतर तो बेंगळुरूच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतूनही मुक्त झाला. त्यावेळी द. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसिसकडे बेंगळुरूच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली होती. विराटने ही कबुली दिली ती महिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेतील बेंगळुरूच्या महिला संघापुढे. बुधवारी यूपी वॉरियर्सविरुद्धच्या लढतीआधी त्याने बेंगळुरू संघाशी संवाद साधला.

‘बेंगळुरूच्या कर्णधारपदाचा माझा कार्यकाळ अंतिम टप्प्यात होता, त्यावेळी माझा आत्मविश्वासच डगमगला होता. नेतृत्वासाठी आवश्यक असणारे मनोधैर्य, जोशही उरला नव्हता. अर्थात तो माझा वैयक्तिक निर्णय आणि दृष्टिकोन होता. तोपर्यंत मी माणूस म्हणून खूप चढ-उतार बघितले होते अन् आणखी त्याक्षणी मला आव्हाने पेलता आली नसती’, विराट सांगतो. २०१६नंतर २०२०च्या मोसमात बेंगळुरू प्रथमच प्लेऑफमध्ये धडकला होता. मात्र जेतेपद दूरच राहिले.

IND vs AUS: वनडे मालिकेत टीम इंडियावर डाव उलटा पडू शकतो; एका गोष्टीमुळे ऑस्ट्रेलिया धोकादायक
प्रतिकूल कालावधी

२०२१च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर विराटने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे मनाशी पक्के केले होते. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपादावरून हटविण्यात आले. विराटने मग कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघांच्या नेतृत्वातून मुक्त झाल्यानंतर विराटने लगेचच बेंगळुरूचे कर्णधारपदही सोडले.

बेंगळुरूचा जॅक्स स्पर्धेबाहेर

आयपीएलला सुरुवात होण्याआधी बेंगळुरूला पहिला धक्का बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्स दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल मोसमालाच मुकणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना त्याला ही दुखापत झाली. गेल्या डिसेंबरमधील लिलावात बेंगळुरूने त्याच्यावर ३.२ कोटींची बोली लावली होती. जॅक्सचा बदली खेळाडू म्हणून बेंगळुरूकडून न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलशी चर्चा सुरू आहे.

पंतऐवजी वॉर्नर कर्णधार

आगामी आयपीएल मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मोटर अपघातात जखमी झाल्याने पंत यंदाच्या लीगमध्ये खेळू शकणार नाही. गेल्या मोसमाप्रमाणे यंदाही उपकर्णधारपद अष्टपैलू अक्षर पटेलकडे असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here