पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवू शकता. आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव खात्याबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्ही सहज पैसे जमा करू शकता.
पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना काय आहे?
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते योजना एक छोटी रक्कम जमा करण्याची योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला पूर्वनिर्धारित रक्कम हप्त्यांमध्ये जमा करतो. या योजनेत तुम्ही फक्त १०० रुपयांची छोटी रक्कम गुंतवणूक सुरुवात करू शकता. तसेच या खात्यात कोणतीही उच्च गुंतवणुकीची मर्यादा नाही. त्यामुळे या खात्यात तुम्ही सोयीनुसार पैसा जमा करू शकतात.
खात्यातील गुंतवणुकीचा कालावधी काय?
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट खाते उघडल्यास त्याचा सुरुवातीचा कालावधी पाच वर्षासाठी असेल. त्यांनतर तुम्हाला मुदतवाढ करायची असेल तर पाच वर्षांनी पोस्टमास्तरांना अर्ज देऊन आणखी पाच वर्षे मुदतवाढ करू शकता. तुम्हाला कोणत्याही बँकेत असेच खाते सुरु करायचे असेल तर तुम्हाला सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे आणि ३ वर्षांचा पर्यायही मिळू शकतो.
पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेचा व्याजदर
पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट किंवा आवर्ती ठेव योजना एक लहान बचत योजना आहे. त्यामुळे या बचत योजनेत तुम्हाला किती व्याज मिळेल हे सरकार निश्चित करते. केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीत सर्व लहान बचत योजनांसाठी व्याजदर सुधारित करते. वित्त मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस आरडी योजनेवर ५.८% व्याज निश्चित केले आहे.
योजनेतील गुंतवणुकीचे गणित
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत १० वर्षासाठी दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर १० वर्षानंतर ५.८ टक्के दराने मॅच्युरिटीवर तुम्हाला १६ लाखांचा परतावा मिळेल.
खात्यात आगाऊ गुंतवणूक करण्याचा पर्याय
पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्ही आगाऊ पैसेही जमा करू शकता. जर तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्ही संपूर्ण पाच वर्षांसाठी पैसे आगाऊ जमा करू शकता. असे केल्याने तुम्हाला काही सूटही मिळेल. समजा तुम्ही दरमहा १०० रुपये गुंतवणुकीतून खाते उघडल्यास आणि किमान सहा हप्ते आगाऊ जमा केल्यास तुम्हाला पहिल्या सहा महिन्यांसाठी १० रुपयांची तर १२ महिन्यांसाठी ४० रुपयांची सूट मिळेल.
इन्कम टॅक्सचा लाभ मिळेल?
होय, पोस्टाच्या या खात्यावर देखील आयकर लागू होतो. खात्यात मिळणाऱ्या व्याजावर टीडीएसच्या स्वरूपात आयकर आकारला जातो, परंतु, जर ठेव रक्कम ४० हजार रुपयापेक्षा जास्त असेल तरच ती वजा केली जाईल. जर तुमची ठेव रक्कम एवढी असेल तर तुमच्यावर वार्षिक १०% दराने कर आकारला जाईल. आवर्ती ठेववर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे, मात्र संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही.