वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हे चौथ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक ठरले. वनडेत सर्वात वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त ३१ चेंडूत शतक केले होते. जर आसिफने सुरुवातीला वेगवान खेळी केली असती तर त्याला एबीचा विक्रम सहजपणे मोडता आला असता. न्यूझीलंडच्या कोरी अॅडरसनने ३६ तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ३७ चेंडूत शतक पूर्ण केले होते.
आसिफ खानचा जन्म पाकिस्तानमधील लाहोर येथे झाला. ३३ वर्षीय आसिफने क्रिकेटचे धडे पाकिस्तानमध्ये घेतले. २००७ ते २०१४ या काळात तो पाकिस्तानमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. लाहोरकडून त्याने ३२ प्रथम श्रेणीचे सामने खेळले. २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तो युएईमध्ये आला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्याला युएईने प्रथमच संघात संधी दिली.
या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या युएईने ५० षटकात ६ बाद ३१० धावा केल्या. उत्तरादाखल नेपाळने ४४ षटकात ६ बाद २६९ धावा केल्या होत्या, तेव्हा खराब प्रकाशामुळे मॅच थांबवावी लागली. नंतर नेपाळला डकवर्थ लुईस नियमानुसार ९ धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.