कोकणातल्या पुलासंदर्भात आमदार शेखर निकम हे सभागृह प्रश्न मांडायला उभे राहिले. त्यांनी बोलताना सांगितले पश्चिम महाराष्ट्राचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, एखादा पश्चिम महाराष्ट्रातला पूल होण्याच्या पैशात रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे साकव होऊ शकतात. यापूर्वी याबाबत सर्वेक्षण झालेले आहे. उदय सामंत यांनी हे सर्वेक्षण केले असल्याचे शेखर निकम यांनी सभागृहात म्हटले. पण याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातला मुद्दा ऐकताच अजितदादा सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी शेखर निकम यांना थांबवत शेखरजी आपण जरूर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारा, मात्र पश्चिम महाराष्ट्राची उपमा देण्याच काय कारण आहे? ते शब्द मागे घ्या, नको नको पश्चिम महाराष्ट्राला ही काही भावना वगैरे आहेत ना बाबा, असे सांगत अजित दादांनी शेखर निकम यांना त्यांचे वक्तव्य मागे घ्यायला लावले.
त्यानंतर शेखर निकम यांनी अजितदादांचे कौतुक करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणाला पॅकेज दिले होते त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की कोकणातल्या साकवांच्या निर्मितीसाठी तसे पॅकेज देणार का? असा प्रश्न शेखर निकम यांनी सभागृहात उपस्थित केला.
या सगळ्या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देताना सांगितले की, शेखर निकम आपण मांडलेल्या मुद्द्याचा या अर्थसंकल्पात नक्कीच विचार केला जाईल व सकारात्मक भूमिका घेतली जाईल. मात्र, शेखर निकम यांनी कोकणातला महत्त्वाच्या असलेल्या साकवांच्या प्रश्नाला सभागृहात उचलून धरला आहे. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनीही यासंदर्भात सातत्याने कोकणातील साकवांचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे आता कोकणातल्या साकवांचा प्रश्न तातडीने मार्गी लागण्याची शक्यता आहे.