पोलिसांनी रिंपल राहत असलेल्या घरात तपासणी सुरू केली. त्यावेळी सर्वात आधी त्यांनी रिंपलने कित्येक आठवडे किंवा महिनाभरही अंघोळ केली नसल्याचं सांगितलं. तिने तिचे कपडेही कित्येक दिवस बदलले नव्हते. तसंच रिंपलच्या घरातील किचनदेखील कित्येक दिवस वापरात नसल्याचं दिसलं. रिंपल राहत असलेल्या चाळीच्या जवळच एक वडापाव स्टॉल आहे. त्या स्टॉलवरील मालकाने पोलिसांना दिलेल्या माहितत सांगितलं की, रिंपल नेहमी त्यांच्या स्टॉलवरुन वडापाव घेत होती. दर १० दिवसांनी रिंपल या वडापावचं बिल ऑनलाइन भरत होती. वडापाव खाऊन झाल्यानंतर त्याचे अनेक पेपरही पोलिसांना रिंपलच्या घरात आढळले. त्यामुळे रिंपल आईच्या हत्येनंतर केवळ वडापाव खाऊन आपले दिवस काढत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई ते कानपूर कनेक्शन

मुंबई ते कानपूर कनेक्शन

रिंपल आणि तिच्या आईचे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी तणावपूर्ण संबंध होते. तसंच त्यांचे त्यांच्या शेजारच्यांशीही संबंध चांगले नव्हते. रिंपलने त्यांच्या घरातील आर्थिक अडचणीमुळे कॉलेजही सोडलं होतं. या दोघीही बेरोजगार होत्या. त्यांना जगण्यासाठी कोणतंही उत्पन्न नव्हतं. दरम्यान, पोलिसांनी रिंपलचा मागील तीन महिन्याचा डेटा तपासला. त्यावेळी तिच्या कॉल लिस्टमध्ये असलेल्या शेवटच्या नंबरचा शोध घेण्यात आला. फोनवरुन शेवटचं रिंपलच्या संपर्कात आलेल्या त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक सध्या यूपीच्या कानपूरमध्ये आहे.

रिंपलच्या कॉल लिस्टमध्ये शेवटचा नंबर

रिंपलच्या कॉल लिस्टमध्ये शेवटचा नंबर

रिंपल सतत ज्याच्याशी कॉलवरुन बोलत होती, तो तिचा प्रियकर तसंच या हत्याकांडातील संशयित असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणात पंचनामा करताना असंही आढळलं, की वीणा जैन यांच्या घरामध्ये बराच काळ कोणीही येताना दिसलं नाही. केवळ रिंपलच अगदी कमीवेळा घराबाहेर पडत होती. कानपूरमध्ये आढळलेला तरुण रिंपलचा या हत्याकांडातील साथीदार असू शकतो किंवा ती केवळ त्याच्याशी फोनवर बोलत होती आणि त्या तरुणाचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नसल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परंतु प्रत्येक संभाव्य गोष्ट तपासण्याची गरज असल्याने, एक टीम कानपूरला पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा – रिंपलचा धक्कादायक खुलासा, आईच्या मृतदेहाचे तुकडे का केले? बाथरुममधून तुकडे गटारात फेकले)

तीन महिन्यांपासून आईच्या मृतदेहाचे तुकडे घरातच

तीन महिन्यांपासून आईच्या मृतदेहाचे तुकडे घरातच

दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी रिंपलने तिच्या आईचा खून केला. त्यानंतर तिने मृतदेहाचे तुकडे करुन ते घरात विविध ठिकाणी ठेवले होते. तब्बल तीन महिने तिने हे हत्याकांड लपवलं होतं. मृतदेहाची दुर्गंधी घालवण्यासाठी तिने २०० अत्तराच्या बॉटल तसंच रुम फ्रेशनर आणले होते. त्या बॉटलचं अजूनही बिल दिलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रिंपलने तिच्या आईच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे बाथरुममधून गटारात टाकले होते. या तुकड्यांमुळे घरातील बाथरुम तुंबलं होतं. बाथरुममधून मृतदेहाचे तुकडे बाहेर जातील असं तिला वाटलं होतं, पण त्याने बाथरुम तुंबलं. त्यानंतर तिने प्रियकराला ड्रेन सक्शन पम्प आणायला सांगितला आणि त्याद्वारे तिने बाथरुम साफ केलं होतं.

वीणा जैन यांच्या भावाची पोलिसांना माहिती

वीणा जैन यांच्या भावाची पोलिसांना माहिती

रिंपल जैन एक वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर रिंपल आणि तिची आई लालबागमध्ये आले. वीणा यांची प्रकृती ठीक नव्हती. तेव्हापासून रिंपल त्यांची काळजी घेत होती. वीणा जैन यांचे मोठे भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रिंपलचं तिच्या आईशी नेहमी भांडण होत होतं. २६ नोव्हेंबर रोजी ते बहिणीला वीणा यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी वीणा यांनी त्यांच्या भावाला रिंपल क्षुल्लक कारणांवरुन भांडण करत असल्याचं सांगितलं. मी रिंपलला माझ्या बहिणीशी भांडण करू नको असंही सांगितल्याचं सुरेशकुमार म्हणाले होते. तसंच त्यांनी रिंपलला तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेन असंही म्हटलं होतं.

२७ नोव्हेंबर रोजी वीणा पहिल्या मजल्यावरुन पडल्याची माहिती

२७ नोव्हेंबर रोजी वीणा पहिल्या मजल्यावरुन पडल्याची माहिती

२७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक शौचालयात जाताना वीणा पहिल्या मजल्यावरुन पडल्या होत्या. आता वीणा या पडल्या की त्यांना पाडण्यात आलं याचा तपास सुरू आहे. ही घटना अंधारात पहाटे पाचच्या सुमारास घडली होती. त्यामुळे याबाबत कोणताही पुरावा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या चौकशीत रिंपलने तिच्या आईचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं सांगितलं. मात्र तिच्या आईच्या मृत्यूसाठी आपल्याला जबाबदार ठरवलं जाईल या भीतीने तिने मृतदेहाची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचं सांगितलं. सध्या रिंपलला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here