अमरावती: दुचाकीने महाविद्यालयात जात असलेल्या विद्यार्थिनीला विरुद्ध दिशेने आलेल्या टिप्परने चिरडलं. त्यात विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हनवतखेडा मार्गावर घडली.

टिप्परच्या मागच्या चाकाखाली आली

प्रतीक्षा राजेंद्र गावंडे (वय- २३ रा. हनवतखेडा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रतीक्षा ही परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात एम. कॉम. ला शिकत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक एमएच २७ एटी ०५९५ ने घरून महाविद्यालयात जायला निघाली. मार्गात टिप्पर क्रमांक एमएच २७ एक्स ६८५६ ने काळ बनून तिला चिरडलं. त्यात टिप्परच्या मागच्या चाकाखाली आलेल्या प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक तेथून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लग्नघरी जात असताना वाटेत काळ आडवा आला, मंजुळकर दाम्पत्याने एकत्र जगाचा निरोप घेतला…
तीन भावंडांमध्ये लहान, कुटुंबातील लाडकी लेक

प्रतीक्षा ही एका प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील असून तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिच्यापेक्षा मोठ्या बहीण आणि भावाचे लग्न झाले होते. प्रतीक्षाला एम. कॉम. पूर्ण करायचे होते. ती एक हुशार, अभ्यासू आणि हसमुख विद्यार्थिनी होती. चांगली नोकरी मिळावी, असे स्वप्न तिने पाहिले होते. मात्र, काळ बनून आलेल्या टिप्परने प्रतीक्षा आणि तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.

प्रतीक्षाच्या मृत्यूला रस्त्यावरील अतिक्रमण कारणीभूत?

सदर रस्त्यावर काही लोकांनी सर्रास अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, याची जाणीव झाल्याने हनवतखेडा येथील सरपंच सुनील ढेपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर आणि अन्य यंत्रणांना पत्र देऊन सावध केले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने एका विद्यार्थिनीचा बळी गेला आहे. प्रशासन आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न सरपंच सुनील ढेपे यांनी उपस्थित केला आहे.
तुला पाहायला पाहुणे आलेत, घरी ये, आईचा फोन; मुलीचा नकार, मग तिने कॉलेजमध्येच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here