मुंबई : मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याच्या आरोपांनंतर अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या पित्याने २०१४ साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला होता, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जयसिंघानीचा फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अनिक्षा जयसिंघानीचा वडील म्हणजे कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याने २०१४ साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला होता, असा दावा केला जात आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या फसवणूक प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचाही कुणासोबतचा फोटो दाखवून चर्चित चर्वण करणाऱ्या आणि स्क्रिप्टेड स्टोरी वर काम करणाऱ्या भक्तगणांनी हा फोटो नीट बघून घ्यावा आणि आपल्या सावकाशीने प्रतिक्रिया द्याव्या” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. सोबत अमृता फडणवीस आणि दानिश हिंगोरा यांचा एकत्र फोटो त्यांनी शेअर केला आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या डिझायनरविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. अनिक्षाने एक कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप मिसेस फडणवीसांनी केला होता. अमृता फडणवीसांनी पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केला होता.

एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिक्षाच्या घरावर छापे टाकत तिला ताब्यात घेतलं होतं. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी असून तो सध्या फरार आहे. त्याच्यावर महाराष्ट्र, गोवा आणि आसाममध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. अनिक्षाने कायद्याचा अभ्यास असून ती सध्या उल्हासनगरात राहते. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्र कर्नाटकात पुन्हा वादाची ठिणगी? शिंदे सरकारच्या निर्णयावर बोम्मईंना आक्षेप, शाहांकडे तक्रार करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here