अकोला: करोनानंतर देशात सध्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसची दहशत पसरली आहे. या विषाणूने आता राज्यातही आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अकोल्यात H3N2 ने पहिला बळी घेतला आहे. एका ७ वर्षांच्या चिमुकल्याचा या विषाणूने घात केला आहे. या चिमुकल्याच्या मृत्यूनंतरच्या अहवालात तो H3N2 पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

हा ७ वर्षीय चिमुरडा वाशिम जिल्ह्यातील राहणारा होता. अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. H3N2 ने मृत्यू झाल्याचा अहवाल आज अकोला जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. H3N2 सोबतच कोव्हिडनेही अकोलेकरांची चिंता वाढविली असून, आज शुक्रवारी कोव्हिडचे चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

वातावरणातील बदलामुळे घरोघरी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्णांचा आजार तीन दिवसांत बरा होत आहे. मात्र, काही रुग्णांचा ताप आठवडाभर, तर खोकला दोन आठवड्यांवर जात असल्याने H3N2 चा धोका वाढला आहे.

H3N2 Virus Updates : टेन्शन वाढलं! अहमदनगरनंतर पुण्यात H3N2 व्हायरसचा रुग्ण दगावला
दरम्यान, अकोला जिल्ह्यात कोव्हिडचाही प्रादुर्भाव वाढत आहे. आज शुक्रवारी करोनाचे चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चारही महिला रुग्ण असून, त्या महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये एका रुग्णाचा H3N2 अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

दरम्यान आता जिल्ह्यात नियंत्रणात असलेली करोनाची स्थिती गेल्या १५ दिवसांत पुन्हा धोकादायक ठरत असल्याच चित्र आहे. अकोला जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या कासवगतीने वाढू लागली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोविडचे १७ सक्रिय रुग्ण आहेत.

दुसरिकडे जिल्ह्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच H3N2 च्या संदिग्ध रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. शासकीय रुग्णालयांसबोतच खासगी रुग्णालयातील संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासणीसाठी जीएमसीच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये पाठविले जात आहेत. मात्र, या ठिकाणी H3N2 च्या चाचणीसाठी आवश्यक टेस्टिंग कीट मर्यादित आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता या कीट अपुऱ्या ठरु शकतात. त्यामुळे चार ते पाच रुग्णांचे नमुने आल्यावरच या कीटचा वापर केल्या जात असल्याची माहिती आहे.

H3N2 ची लक्षणं कोणती आणि काय आहेत बचावात्मक उपाय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here