किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावीत व आ. विनोद निकोले हे समितीत असावेत, असे गावीत यांनी सुचविले. मात्र, मतदारसंघातील कामांमुळे मला समितीत वेळ देता येणार नसल्याने व डॉ. अजित नवले यांचा शेतकरी प्रश्नांबद्दल सातत्याचा पाठपुरावा असल्याने त्यांना समितीत घ्यावे, अशी सूचना आ. विनोद निकोले यांनी केली होती. आ. विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे व कॉम्रेड जे.पी.गावीत यांनी लगेचच डॉ. अजित नवले यांचे नाव समितीत असावे असे मुख्य सचिव यांना एकमताने व तत्काळ सांगितले होते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रस्ताव नाकारला आहे.
मान्य केलेल्या मागण्यांचे इतिवृत्त योग्यप्रकारे तयार व्हावे, यासाठी कॉम्रेड गावीत यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली तेव्हा समितीत डॉ. अजित नवले यांचे नाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. असे का झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता त्यांना सुसंगत उत्तर मिळाले नाही. वन जमिनीच्या प्रश्ना बरोबरच, कांदा, दूध, सोयाबीन, कापूस, हरभरा, हिरडा पिकांचे घसरत असलेले भाव, मिल्कोमीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली लूट, कर्जमाफी, देवस्थान व गायरान जमीन, पीक विमा, पीक नुकसान भरपाई, पुनर्वसन, यासारख्या प्रश्नांवर बाजू मांडण्यासाठी डॉ. अजित नवले समितीत हवेत अशी किसान सभेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मी समितीत नसलो तरी आ. विनोद निकोले सरकारला पुरून उरतील व शेतकऱ्यांच्या मागण्या धसास लावतील असा विश्वास डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला आहे.