पोलिसांच्या चौकशीदरम्यान इब्राहिम कासिम इमारतीच्या तळमजल्यावरील चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या दोन वेटर्सनी एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस या दोन्ही वेटर्सची चौकशी करत आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितले की, वीणा जैन या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्यातून खाली पडल्या तेव्हा अत्यंत गंभीर अवस्थेत होत्या. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा आम्ही दोघे वीणा जैन यांना उचलून पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत घेऊन गेलो. आम्ही वीणा जैन यांची नस तपासली होती. तेव्हा वीणा जैन यांचा मृत्यू अटळ असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही रिंपलला सांगितले की, तुझी आई गेलेय, तू सर्व नातेवाईकांना बोलावून घे, असे या चायनीजच्या दुकानातील वेटर्सनी सांगितले. मात्र, रिंपलने आम्हाला तिथून निघून जाण्यास सांगितले. मी हे सर्व सांभाळून घेईन, असे सांगत रिंपलने दोघांनाही पिटाळून लावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या सगळ्यावरुन वीणा जैन या पहिल्या मजल्यावरुन खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत असले तरी त्यांना रिंपलनेच खाली ढकलले का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
दरम्यान, रिंपलने यापूर्वीच मीच आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. मात्र, रिंपल एकट्याने मृतदेहाचे तुकडे करु शकेल, याबद्दल पोलिसांना संशय आहे. या कामात तिला बॉबी सँडविचवाल्याने मदत केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. हा सँडविचवाला व्हॉटसअॅपवरुन सतत रिंपलच्या संपर्कात होता. वीणा जैन यांचा मृतदेह सापडल्यानंतर हा सँडविचवाला फरार झाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन या सँडविचवाल्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. या सँडविचवाल्याला आणि रिंपल जैनला शुक्रवारी समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांचा सँडविचवाल्यावरील संशय आणखी बळावला आहे. या सँडविच विक्रेत्यानेच फरशी कापण्याच्या मशिनने वीणा जैन यांचा मृतदेह कापण्यासाठी रिंपलला मदत केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
रिंपलने दोन दिवस आईचा मृतदेह तसाच ठेवला त्यानंतर तुकडे केले
पोलिसांच्या तपासात नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, वीणा जैन यांचा पहिल्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्यानंतर रिंपलने त्यांचा मृतदेह दोन दिवस तसाच घरात ठेवून दिला. त्यानंतर रिंपलने वीणा जैन यांच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली आणि नंतर ते घरात लपवून ठेवले. रिंपलने यापूर्वीच मी आईची हत्या केली नसल्याचा दावा केला आहे. २७ डिसेंबरला पहाटे साडेचार वाजता माझी आई पहिल्या मजल्यावरील व्हरांड्यातून चाळीतील सार्वजनिक शौचालयात जात असताना ती वरुन खाली पडली, असे रिंपलने म्हटले होते. मात्र, शेजाऱ्यांच्या दाव्यानुसार रिंपल आणि तिच्या आईची अनेकदा भांडणं व्हायची. त्यामुळे पोलिसांना रिंपल हिनेच वीणा जैन यांची हत्या केली असावी, असा संशय आहे.