अमेरिकेतील बँक संकटामुळे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा भाव रु. ५९,४६१ प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकापर्यंत वाढले आहेत. यापूर्वी शुक्रवारच्या सत्रादरम्यान सोन्याने ५८ हजार ८४७ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक नोंदवला होता.
MCX वर सोन्याचा भाव
मागील आठवड्याच्या शेवटी रु. ५६,१३० प्रति १० ग्रॅमच्या बंदच्या तुलनेत मौल्यवान सोन्याच्या दरात १,४१४ रुपये प्रति १० ग्रॅमची भर पडली असून सोन्याच्या भावांनी ५९ हजार ४२० रुपयाच्या सध्याच्या विक्रमी पातळीवर झेप घेतली आहे. दरम्यान, यापूर्वी २ फेब्रुवारी २०२३ रोजी सोन्याचा भाव ५८ हजार ८४७ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांत सोन्याचा भाव ५५ हजारांच्या आसपास खाली पडला, मात्र अमेरिकन बँकिंग संकट आणि त्यानंतर युरोपियन सेंट्रल बँकेने व्याजदरात केलेली वाढ, यामुळे सोन्याला आधार मिळाला. या सर्व जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावाने आता विक्रमी उच्चांक गाठला आहे.
दुसरीकडे, नजीकच्या काळात मौल्यवान सोन्याच्या भावात आणखी तेजीची शक्यता वर्तवण्यात आली असून किमती ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि लग्नसराई तसेच सणवारांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही काळात सोन्याची मागणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे यंदा खरेदीदारांना खरेदीसाठी जास्त पैसा मोजावा लागेल असे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस $१,९८८.५० वर क्लोज झाला असून मागील आठवड्यात $१,८६७ प्रति औंसच्या तुलनेत त्यात ६.४८ टक्क्यांनी साप्ताहिक वाढ झाली.
यूएस फेडवर नजर
२१ ते २२ मार्च २०२३ दरम्यान होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या FOMC बैठकीच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. अमेरिकेतील सद्य स्थिती लक्षात घेता यूएस फेडच्या व्याज दरात आणखी वाढ अपेक्षित आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होताना दिसेल. देशातील तीन प्रमुख यूएस बँका – सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक – बँक झाल्यामुळे फेड रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदरात आक्रमक भूमिका घेईल याबाबत अपेक्षा वाढली आहे.