चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. बावनकुळे यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये बेबनाव निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त ४८ जागा लढवायला? भाजप-शिवसेना जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो काही निर्णय घेतील त्यांना घेऊ दे. चंद्रशेखर बावनकुळे यांना हे अधिकार कोणी दिले? अशाने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटले होते?
बावनकुळे यांनी भाजपच्या एका खासगी कार्यक्रमात शिवसेना-भाजपमधील संभाव्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. २०२४ मध्ये भाजपचे १५० ते १७० आमदार १०० टक्के निवडून येतील. आपण २४० च्या आसपास सीट लढण्याच्या विचारात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ५० पेक्षा जास्त आमदारच नाहीत, असे बावनकुळे यांनी म्हटले. अवघ्या काही तासांमध्ये बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर प्रतिक्रिया उमटू लागताच भाजपकडून सारवासारव करण्यात आली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढण्यात आला. तसेच बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तसे वक्तव्य केल्याची सारवासारव भाजपकडून करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचा इन्कार केला होता. माझ्या व्हिडिओचा अर्धा भाग दाखवून वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते.