कोल्हापूर : शंभर गावांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कोल्हापूरच्या कणेरी मठाने राबवला आहे. त्या गावांना जे-जे काही लागेल, ते-ते सारे तेथेच उत्पन्न होईल, तयार होईल, त्याची खरेदी-विक्रीही तेथेच होईल, त्या गावातून एकही वस्तू ना विक्रीला बाहेर जाईल, ना बाहेरची वस्तू त्या गावांत. एकमेकांच्या मदतीने ही शंभर गावं आत्मनिर्भर होतील, ज्यातून स्वावलंबी ग्रामयोजना साकार होईल. यासाठी पुढाकार घेतला आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्री सिद्धगिरी महासंस्थानने. पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे कामही आता सुरू झाले आहे.

पूर्वीच्या काळात बहुतांशी गावे स्वावलंबी होती, मात्र गावांचा विकास होत गेला. लोकसंख्या वाढत गेली, त्यातून आयात-निर्यातीसह परावलंबीपणा वाढत गेला. दैनंदिन जीवनासाठी जे काही लागते, ते सर्व उत्पादित करण्यापेक्षा विकत घेण्याची वृत्ती बळावली. सहज उपलब्धतेमुळे हे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे देशी बी-बियाणांपासून ते सेंद्रिय शेतीतील उत्पादनापर्यंत पूर्वी सर्वकाही मिळणारे नंतर मिळेनासे झाले. गावातील उत्पादनांना गावातच बाजारपेठ मिळवून देणारी गल्ली बाजारपेठ बंद झाली. यामुळे गावांच्या उत्पन्न आणि उलाढालीवर मर्यादा आल्या.

या पार्श्वभूमीवर कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी महासंस्थानने आत्मनिर्भर अर्थात स्वावलंबी ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. त्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील शंभर गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. यासाठी मठाची एक टिम कार्यरत झाली आहे.

पाच दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील गाठीची शस्त्रक्रिया, कोल्हापूरच्या डॉक्टरांकडून जीवदान
या योजनेनुसार दैनंदिन जीवनात जे काही लागते ते सर्व या शंभर गावातच उत्पादित केले जाईल. धान्य, भाजीपाला, कपडे, गॅस या सर्व उत्पादनांना शंभर गावातच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी सर्व दुकानदारांची मदत घेण्यात येणार आहे. शंभर गावातच उत्पादक व ग्राहक यांची साखळी होईल. यातून स्थानिक लोकांनाच जे हवे ते या गावातच मिळेल. तेही दर्जेदार आणि कमी दरातही. विशेष म्हणजे ही गावे एलपीजी मुक्त करण्यात येणार आहेत. गावागावात गोबरगॅस प्रकल्प राबवत एकमेकांना गॅस पुरवठा करण्यात येईल. युवकांना रोजगार, महिलांना उद्योग, बचत गटांना काम मिळवून देत सर्वांनाच स्वावलंबी करण्याची ही योजना आहे.

महिला प्रवाशांकडून शिंदे सरकारचं तोंडभरून कौतुक; म्हणाल्या आमच्या हिताचा निर्णय घेतला

स्वावलंबी ग्राम योजना जुन्या काळात होती, तीच पुन्हा एकदा सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी शंभर गावे निवडण्यात आली आहेत. तेथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर गावांची संख्या वाढविण्यात येणार आहे. देशभरात मॉडेल म्हणून हे अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली.

दोनदा वाचले, पण तिसरी कारवाई फत्ते; पन्हाळ्याच्या पायथ्याशी सेक्स रॅकेट, तिघे जण ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here