मुंबई: आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळे अखेर मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणात आला आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुंबईतील ७० टक्के बंद करण्यात आले आहेत. महापालिकेने कोविड सेंटरसाठी घेतलेले लॉज, हॉटेल्स आणि खासगी इमारतीतील खोल्या पुन्हा संबंधितांना परत केल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात मुंबईतून करोनाचं समूळ उच्चाटन होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

१ एप्रिल रोजी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी इमारती आणि छोट्या घरांमध्ये करोनाचे रुग्ण अधिक वाढल्याचं सांगितलं होतं. सार्वजनिक शौचालय असल्यामुळे हा प्रादुर्भाव वाढत असल्याने या रुग्णांना क्वॉरंटाइन करण्याची गरज परदेशी यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने मुंबईतील रिकाम्या इमारती, हॉटेल्स, लॉज, लग्नाचे हॉल, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स आणि मोकळी मैदाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर उभारून संशयितांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. गेल्याच आठवड्यात पालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी नॉन स्लम विभागातून ८० टक्के नवे रुग्ण सापडले असल्याचंही सांगितलं होतं.

काही महिन्यांपूर्वी मुंबईत करोनाचे प्रचंड रुग्ण सापडत होते. विशेष करून झोपडपट्टीतून सापडणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे क्वॉरंटाइन सेंटरची मोठ्या प्रमाणावर गरज होती. झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांना स्वत:च्या घरातच क्वॉरंटाइन होण्यास सांगणं योग्य नव्हतं. जागेच्या अभावी त्यांना ते शक्यही नव्हतं. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलविणेच योग्य होतं. मात्र, झोपडपट्ट्यामंधील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने आता कोविड सेंटरची गरज उरली नाही, असं पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, ई वॉर्ड असलेल्या भायखळ्यात सर्वाधिक २१ क्वॉरंटाइन सेंटर होते. त्यापैकी १९ क्वॉरंटाइन सेंटर बंद करण्यात आले असून या ठिकाणी आता फक्त दोनच क्वॉरंटाइन सेंटर सुरू आहेत. त्यानंतर धारावी असलेल्या जी/ उत्तर विभागात १९ कोविड केंद्र होते. त्यापैकी ११ केंद्र बंद करण्यात आली आहेत.

दरम्यान, राज्यात काल पुन्हा एकदा एकाच दिवशी ९ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात करण्यास यश मिळवले आहे. काल दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून ९ हजार ९२६ रुग्ण करोना विरुद्धची लढाई जिंकून घरी परतले आहेत. तर, राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७६ हजार ८०९ रुग्णांनी करोनाला हरवलं असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६२.७४ % इतके झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९ हजार ५०९ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २९० जणांचा करोनानं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के इतका आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ चाचण्यांपैकी नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here