अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामात तुरीची चांगली पेरणी करण्यात आली. मागील महिन्यात तुरीचे भाव स्थिर होते. परंतु, मार्च महिन्यात सुरुवातीला तुरीच्या भावात काहिशी घसरण पाहायला मिळाली. आता पुन्हा तुरीच्या भावात तेजी येत आहे. काल तुरीच्या कमाल दरात ९० तर किमान दरात ८०० रुपयांची वाढ झाली. आज शनिवारी १०५ रुपयांनी तुरीचे भाव वाढले आहेत. कमीत कमी ६ हजार पाचशे ते ८ हजार ४०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांत तुरीची आवक चांगली झाली, पण गेल्या दोन-तीन दिवसात तुरीची आवक मंदावली आहे. काल अकोल्याच्या बाजारात ६६२ क्विंटल इतकी दूर खरेदी झाली होती तर आज ७२३ क्विंटल तूरीची आवक झाली आहे.
सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे भाव नाही, अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवला आहे, आज इच्छा नसतानाही मिळेल त्या भावात थोड़ा थोड़ा करून शेतकऱ्यांना आपला कापूस विकावा लागतं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आता तुरीकडून अपेक्षा उरल्या आहेत. म्हणून तुरीची भाववाढीच्या अपेक्षेपोटी शेतकऱ्यांकडून तुरीची विक्री केली गेली नाही. मात्र, मार्च महिन्यात तुरीचे भाव वाढल्याने शेतकरी तूर बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
अकोटच्या कृषी बाजारात आज तुरीला ७ हजार ४९५ पासून ८ हजार ४८० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर १ हजार २७५ क्विंटल इतकी तुरीची आवक झाली. अकोल्याच्या बाजार दराच्या तुलनेत अकोटच्या बाजारात तुरीला ८० रुपयांनी जादा भाव होता.
रासायनिक खते, शेती अवजारे, कीटकनाशके, बियाणे, मजुरीसह अन्य गोष्टींचा खर्च दर वाढला आहे. त्यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढते आहे. या गुंतवणुकीच्या तुलनेत जास्तीचा किमान परतावा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा राहते. पण, शेतमालाच्या भावासंदर्भात निश्चित असे धोरण घेतले जात नाही. म्हणून याचा फटका शेतकऱ्यांना सातत्याने बसत राहतो.
दरम्यान, काल अकोल्याच्या बाजारात हरभऱ्याला कमीत कमी ४ हजार जास्तीत जास्त ४ हजार ७३० इतका भाव मिळाला असून सरासरी भाव ४ हजार ४४० इतका होता. आज या भावात २० रुपयांनी घसरण झाली असून ३ हजार ९०० पासून ४ हजार ७१० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे हरभऱ्याला भाव मिळाला असून ७७७ क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली.