लातूर शहर महापालिकेने वर्षभरापूर्वी महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा सुरू केली होती. मनपाच्या या उपक्रमाला आज वर्ष झालं आहे. महिलांना मोफत सेवा देणारी लातूर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. महिलांसाठी अतिशय महत्वाचा उपक्रम राबविणाऱ्या या महानगर पालिकेचे अंजली अविनाश पाटोळे या विद्यार्थिनीने आभार मानलेत. ती छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय या महाविद्यालयात शिक्षण घेत असून, विविध ठिकाणी खासगी शिकवणीला ही जाते त्यामुळे तिचा दिवसभरातून प्रवासासाठी मोठा खर्च व्हायचा मात्र आता ती सिटी बस ने प्रवास करत असल्याने तिचे पैसे वाचत असून त्याचा उपयोग आता ती आता शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी करू शकते, असे ती सांगते.
खासगी नोकरी करणाऱ्या सुनंदा ठाकरेही सिटी बसने दररोज मोफत प्रवास करतात. वाढत्या महागाईत महिलांना घराच (किचन) बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. अगदी पाच दहा रुपयांपासून महिलांना विचार करावा लागतो. त्यामुळे महानगर पालिकेचा हा उपक्रम मोठा आधार देत असल्याचं त्या सांगतात. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे त्यांची महिन्याला १२०० रुपयांची बचत होते. या बचतीचा उपयोग त्यांना महाग झालेलं सिलेंडर खरेदी करण्यासाठी होतो असही त्या आवर्जून सांगतात, तसेच मोदी सरकारला त्या सिलेंडरचे दर कमी करण्याचं आवाहन ही करतात.
आमदार धीरज देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे. जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक सर्व सामान्य महिलांनी मोफत सिटी बसचा प्रवास केल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. आज माध्यमातून दिली आहे. “आज 18 मार्च लातूर मधील महिलांसाठी एक अविस्मरणीय दिवस आहे. ‘जे जे नवे, ते ते लातूरला हवे’, हा विचार समोर ठेवून तत्कालीन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख साहेब यांनी केलेल्या सूचनेवरून याच दिवशी महिलांसाठी लातूरमध्ये मोफत सिटी बस सेवेची सुरुवात झाली,” असं त्यांनी म्हटलं आहे.