संजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर

करोनाच्या संकटामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बदलत्या काळानुरुप सण साजरे करण्याच्या पद्धतीतही बदल करावे लागले आहेत. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ” ही शॉर्ट फिल्म आली आहे. राखीऐवजी सध्याच्या काळात अतिशय आवश्यक बनलेला मास्क बहीण भावाला पाठवते असं यात दाखवण्यात आलं आहे. या लघुपटातून ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एकमेकांपासून दूर राहणाऱ्या अनेक भावा – बहिणींना यंदाच्या राखीपौर्णिमेला भेटणं मुश्कील होणार आहे. अनेकांना प्रत्यक्ष भेटता येणार नाही. परंतु, असं असूनदेखील त्यातून मार्ग काढत, सण साजरा करण्याचा प्रयत्न या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आला आहे. दूर राहणाऱ्या बहिणीनं रक्षाबंधनाची राखी म्हणून एक मास्क पाठवला. त्यातून बहिणीनं भावाच्या रक्षणाची योग्य प्रकारे जबाबदारी घेतली. तसंच प्रत्यक्ष भेटता येत नसल्यानं व्हिडीओ कॉलवर ओवाळणीदेखील केली. सण साजरा करण्याची ही अनोखी पद्धत या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे.

रक्षाबंधनाच्या संकल्पनेला नवं रूप देत काहीतरी विचारपूर्वक संदेश देण्याचा प्रयत्न ट्रायसिकल फिल्म्सनं केला आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कुंजीका काळवींट आणि जय पाठक या कलाकारांनी काम केलं आहे. तसेच अमेय मापुसकरनं शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. गौरव रावराणेनं ही शॉर्ट फिल्म लिहिली असून, नयन शाहनं सिनेमॅटोग्राफी केली आहे. किरण छेडा, अक्षीता शाह यांनी यासाठी सहाय्य केलं आहे.

राखीपौर्णिमा सणाचं आजचं स्वरूप लक्षात घेऊन यातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देता आला. रक्षाबंधन म्हटलं की भावानं बहिणीचं रक्षण करणं असं होतं. परंतु या शॉर्ट फिल्ममध्ये रक्षाबंधन या सणाची संकल्पना पुन्हा नव्यानं उलगडून सांगताना मजा आली. नेहमी रक्षण करणाऱ्या भावाला आपणही जपलं पाहिजे आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे असा विचार करत, बहिणीनं राखीच्या ऐवजी स्वतःचं रक्षण करणारा मास्क त्याला दिला. सणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून बदलल्याचं दिसतंय.

– कुंजीका काळवींट (अभिनेत्री )

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here