कोल्हापूर : पन्हाळा गडावरील सज्जा कोटी येथे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर जोडले सात’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना तटबंदीवरून १९ वर्षीय तरुण १०० फूट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नागेश खोबरे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून ही घटना शनिवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पन्हाळगडावर गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. दरम्यान काल रात्री पावणे नऊच्या सुमारास पन्हाळगडावरील सज्जा कोटी येथील तटबंदीवर चित्रीकरण सुरू असताना १९ वर्षीय नागेश खोबरे (राहणार-सोलापूर) या तरुणाचा तोल जाऊन तो १०० फूट खाली कोसळला.

पुण्यातील चांदणी चौक परिसरात बस १५ फूट खाली कोसळली; ८ प्रवासी जखमी

चित्रीकरणासाठी गडावर घोडे आणण्यात आले होते. या घोड्यांची देखभाल करण्यासाठी नागेश खोबरे हा तरुण तेथे काम करत होता. यावेळी सज्जा कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवर मोबाईल फोनवरील संभाषण संपून जात असताना नागेशचा तोल गेला आणि तो तटबंदीवरून थेट १०० फूट खाली कोसळला. ही घटना उपस्थित लोकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने खाली दोर सोडत काहीजण खाली उतरले. यावेळी नागेशला बांधून वर काढण्यात आले. खाली कोसळल्याने नागेशच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्याला सीपीआरमधून एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र सदर घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे देखील समोर आलं आहे. जखमीला उचलून वर आणताना त्याचे मोबाईल चित्रीकरण करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणाला मारहाण झाल्याचे समजते.

दरम्यान, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेडात ‘मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील सात कलाकारांच्या भूमिका व त्यांच्या वेशभूषेबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here