मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहारचे पोलीस अधीक्षक यांना मुंबई महापालिकेने क्वॉरंटाइन केल्याने पालिकेवर टीकेची झोड उठत आहे. मात्र, मुंबई महापालिकेने तिवारी यांचे अलगीकरण योग्यच असल्याचं सांगत राज्य सरकारच्या नियमावलींचा हवाला दिला आहे. त्यामुळे तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे बिहारमधून आले होते. गोरेगावच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहात ते थांबले होते. त्याची माहिती पालिकेच्या पी/दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर जाऊन त्यांना क्वॉरंटाइन केले. तिवारी हे देशांतर्गत प्रवासी असल्याने राज्य शासनाच्या नियमावलीनुसार त्यांना होम क्वॉरंटाइन करणे आवश्यक होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली.

विश्रामगृहात गेल्याने तिवारी यांना शासनाचा नियम आणि देशांतर्गत प्रवाशांना क्वॉरंटाइन करण्याची प्रक्रिया सांगण्यात आली. त्यांना राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्याची नियमावली दाखवण्यात आली आणि त्यानुसार त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचा खुलासा पालिकेने केला आहे.

सूट हवी तर अर्ज करा

दरम्यान, राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे नियमावलीनुसार अर्ज केल्यास क्वॉरंटाइनमधून सूट मिळेल, अशी माहितीही तिवारी यांना दिल्याचा दावा पालिकेने केला आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे काल रविवारी पटना येथून मुंबईत तपासासाठी आले होते. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी काल रात्री ११ वाजता तिवारी यांना गोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच तिवारी यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्काही मारण्यात आला आहे. दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलिसांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं ट्विट पांडेय यांनी केलं होतं. त्यानंतर मीडियाने तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता मला क्वॉरंटाइन करण्यात आलं असून माझ्या टीमशी मी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच संपर्क साधू शकलो आहे. महाराष्ट्र सरकारची ऑर्डर दाखवल्यानंतर मला क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. मात्र, मी मुंबई विमानतळावर आल्यावर माझी कोणीही करोनाची चाचणी केली नाही किंवा त्यासंदर्भात माझी चौकशीही केली नाही. माझा करोना स्वॅबही घेण्यात आलेला नाही. मी ड्युटीवर आहे. त्यामुळे मला यातून सूट द्यायला हवी. मी १४ दिवस क्वॉरंटाइन राहिल्यास या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होईल, असं तिवारी यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबई महापालिकेने तिवारी यांना क्वॉरंटाइन केल्याने बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी आज दुपारी २ वाजता बिहार पोलिसांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here