पोलिसांनी सांगितले, की ही घटना दिनांक १७ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली आहे. तक्रारदार तोरणे कुटुंबीय रात्री साडेअकरा वाजता जेवण करुन झोपी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्याने तोरणे कुटुंबीय जागे झाले. यावेळी एक चोरटा खिडकीतून दरवाजाची कडी काढून घरात आला. या घटनेने तोरणे कुटुंबीय हादरुन गेेले व गोंधळ झाला. यावेळी आणखी एक चोरटा घरात आला व तिसरा बाहेर थांबलेला होता. एका चोरट्याने धारदार चाकू काढून त्याने दहशत माजवली.
१० मिनिटे सुरू होता थरार
चाकूचा धाक दाखवून चोरट्याने कपाटाची किल्ली मागितली असता ती नसल्याचे सांगताच तक्रारदार व त्यांच्या मुलीला चोरट्याने ढकलून दिले. घरातील कपाटाकडे जावून त्यातील रोख १८ हजार रुपये व पैंजण असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला. सुमारे १० मिनिटे हा थरार सुरू होता. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर ते पळून गेले.
घाबरलेल्या तक्रारदार तोरणे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगून त्यानुसार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.