म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ठाणे-बोरिवली टेकडी अर्थात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या टेकडीभोवती रस्ता बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. घोडबंदर रस्त्याला पर्याय असलेला हा २.२ किमी लांबीचा रस्ता टेकडीच्या ठाणे बाजूने बांधला जाणार आहे.

ठाणे हे नाशिक, पुणे आणि मुंबई, या तिन्ही दिशांना जाण्यासाठीचे प्रमुख शहर आहे. अहमदाबादहून नाशिक, पुणे गाठणारी सर्व वाहने ठाणे शहरातूनच जातात. यासाठी घोडबंदर रस्त्याचा उपयोग केला जातो. परिणामी घोडबंदर रस्ता हा कायम गर्दीने गजबजलेला, वाहनांच्या गर्दीचा असतो. या रस्त्यावरील गायमुख ते कासारवडवली हा भाग दिवसाभरातील किमान सहा तास वाहतूककोंडीने व्यापलेला असतो. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कसोशीने प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत विविध प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. त्यामध्येच ‘टेकडी पायथा रस्त्याचे नियोजन केले जात आहे.

साताऱ्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानेच मारला ६३ लाखांवर डल्ला

एमएमआरडीएनुसार, हा रस्ता साधारण २.२ किमी लांबीचा असेल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाणे बाजूकडील डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता बांधला जाईल. प्रामुख्याने डोंगरीपाडा, ओवळे, गोवनीवाडा, भाईंदरपाडा ते गायमुख या परिसरांना हा रस्ता जोडला जाईल. त्यामुळे घोडबंदर रस्त्याच्या पश्चिमेकडे आत राहणाऱ्यांना ठाणे शहर गाठण्यासाठी किंवा नाशिक, पुणे दिशेने जाण्यासाठी किमान तीन किमी लांबीवरील घोडबंदर रस्ता टाळता येईल. परिणामी घोडबंदर रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे नियोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here