त्यातूनच आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा, ज्या काही पेन्शन योजना चालू करायच्या आहे त्या माझ्या शेतकरी वर्गासाठी चालू करा.’ अशी मागणी केली आहे.
रौंधळवाडीचे सरपंच नाना रौंधळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत शासकीय कर्मचाऱ्यांचे लाड थांबत आता शेतकऱ्यांनाच पेन्शन सुरु करण्याची मागणी केली आहे. रौंधळवाडी ग्रामपंचायतीच्या या पत्राची सध्या जिल्ह्याभर जोरदार चर्चा सुरु आहे.
काय आहे रौंधळवाडी ग्रामपंचायतीचे पत्र?
”राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा. राज्यातील शासकीय कर्मचारी वर्गाने जुनी पेन्शन योजना लागू करणे व मागण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना काम कमी आणि गडगंज पगार आणि त्यातूनही कामात करत असलेले दिरंगाई व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर होत असलेला भ्रष्टाचार या सर्वांचा विचार करता यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे योग्य नाही. जुनी पेन्शन योजना लागू करणे म्हणजे सरळ सरळ सर्व सामान्य जनतेवर व शेतकरी वर्गावर आर्थिक भार. राज्य सरकार घरातून पैसे आणत नाही हा पैसा सर्व सामान्य जनतेचा व शेतकरी वर्गाचा आहे.
त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की, आपण जुनी पेन्शन योजना चालू करू नये. ज्या काही पेन्शन योजना चालू करायच्या आहे त्या माझ्या शेतकरी वर्गासाठी चालू करा ही नम्र विनंती”.