चाळीसगाव शहरात कन्नड रोडवर एच.एच.पटेल हि तंबाखूची कंपनी असून या कंपनीमध्ये रविवारी रात्री मजूर हे गटारीचे बांधकाम करत होते. यावेळी अचानक काम सुरू असताना कंपनीच्या कुंपणाची संरक्षण भिंत कोसळली. यावेळी काम करणारे मोहम्मद अकील साकील अली, लतिफ विनीत कुमार जमुना प्रसाद चौरसिया आणि लतिफ रहीम बक्स या तिघांच्या अंगावर कंपनीची जुनी संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत तिघंही भिंतीखाली दाबले जाऊन तिघांचा जागीच अंत झाला.
तिघांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. दरम्यान. एच. एच. पटेल कंपनीच्या निष्काळजी पणामुळेच तिघांचाही जीव केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद चाळीसगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एक मजूर जखमी झाल्याची माहिती असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कंपनीचे बांधकाम किती जुनं आहे? याकडे कंपनी मालकाचे दुर्लक्ष झाले आहे का? कंपनीला नगरपालिकेकडून बांधकामाबाबत काही नोटीस देण्यात आली होती का? अचानक भिंत कशी कोसळली? असे एक ना अनेक प्रश्न आता तिघा निष्पाप मजुरांच्या मृत्यूमुळे उपस्थित होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.