सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस तसेच वादळी वारा सुरू आहे. त्यामुळे जळगाव शहरात काही ठिकाणी विद्युत तारा तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी या तार लोंबकळलेल्या आहेत. जळगाव शहरातील निमखेडी भागात काही ठिकाणी वीज तारा लोंबकळलेल्या आहेत. या परिसरात राहणारी ५ वर्षांची धनवी ही गल्लीत शेजारी राहणाऱ्या लहान मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी खेळता खेळता एका विद्यूत तारेला धनवीचा चुकून स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला.
लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
यामुळे ती गंभीर जखमी झाली. प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी धनवीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच धनवीची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. आपल्या गोंडस चिमुकलीच्या मृत्यूचे ऐकताच तिच्या आई – वडीलांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला.
धनवीचे वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. धनवीच्या पश्चात आई, वडील, आजी आणि एक बहीण असा परिवार आहे. या दुदैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.