खासदार संजय राऊत अडचणीत
बार्शी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कामात दिरंगाई केल्याप्रकरणी चार पोलिसांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार राऊत यांनी शनिवारी दुपारी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला फोटो ट्विट करत संशयित आरोपी मोकाट आहेत. भाजप पुरस्कृत आहेत, असा आरोप केला होता. फोटोतून पीडित अल्पवयीन मुलीची ओळख दाखवण्यासारखे कृत्य केल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. अखेर बार्शी पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्यावर भा.द.वि.जे.जे ऍक्ट 74,228-ए,नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी फोनवरून अधिकृत माहिती दिली.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी
पीडितेच्या कुटुंबीयांचा टाहो; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कडक शिक्षेची मागणी
पीडित मुलीवर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोयत्याने वार केल्याने तिच्या डोक्यावर, हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. उजव्या हाताची बोटे तुटली आहेत. यामुळे पीडितेच्या आई वाडीलांनी न्यायाची मागणी केली. संशयित आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संशयित आरोपींचा बार्शीत राजकीय नेत्यांशी संपर्क आहे. संशयित आरोपींचे राजकीय नेत्यांसोबत असलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट केला होता. संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो व्हायरल केल्याबद्दल चित्रा वाघ यांनी ट्विटमधून आक्षेप घेतला होता. तसेच महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणीही केली होती. चित्रा वाघ यांनी गृहविभाग आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.