विदर्भात जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात वाशिम जिल्ह्यात कामरगा येथील सभेत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सभेत केलेल्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. मी आताच मंत्री झाले आहे, खिसा अजून गरम झालेला नाही, असं वक्तव्य ठाकूर यांनी केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका सुरू असून काँग्रेसही अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटवरवरून यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या भाषणाची क्लिप शेअर केली आहे. या आमच्या मंत्री आहेत. त्यांनी खिसा अजून गरम व्हायचा आहे, असं सांगितलं. ह्यांच्यामुळे पक्ष बदनाम होत असून ह्याचसाठी सत्तेत जाण्याचा हट्टहास केला का, असा सवालही निरुपम यांनी विचारला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते त्यावेळी खूप गाजले होते. मात्र, त्याचा शब्दश: अर्थ घेऊन पराचा कावळा करु नका अशी सारवासारव दानवे यांनी त्यावेळी केली होती. परिणामी नजीकच्या काळात मंत्री यशोमती ठाकूर वरील वादग्रस्त वक्तव्याबद्दलही अशीच सारवासारव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times