देशांतर्गत मार्केटची सुरुवात
आज बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहार सत्रात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३३४.३२ अंक म्हणजेच ०.५८ टक्के वाढीसह ५७,९६३.२७ अंकांच्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा निफ्टी ७२ अंक किंवा ०.४२ टक्क्यांची उसळी घेत १७,०६०.४० अंकांवर उघडला. दरम्यान, सुरुवातीच्या काही मिनिटांत बीएसई सेन्सेक्सचे ३० पैकी २२ समभाग तेजीसह व्यवहार करत होते तर निफ्टीच्या ५० पैकी ३४ स्टॉक्स मजबूतीच्या हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. याशिवाय १६ समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली.
कोणते शेअर्स वधारले, कोणते आपटले
सुरुवातीच्या सत्रात निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकावर नजर टाकली तर आयटी, एफएमसीजी, फार्मा आणि हेल्थकेअर निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर मीडिया शेअर्सनी निर्देशांकात वाढ नोंदवली असून १.२ टक्के उसळी घेतली आहे. तसेच PSU बँकिंग शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी वाढले तर तेल आणि वायूसह ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर्स ०.७१ टक्क्यांनी वधारले. वित्तीय सेवा क्षेत्रात ०.५५ टक्के वाढीसह व्यवहार होत आहे.
विदेशी बाजारांत तेजी
रविवारी क्रेडिट सुइस आणि UBS यांच्यात आर्थिक करार झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांनी मोकळा श्वास घेतला असून सोमवारी अमेरिकन बाजार तेजीने बंद झाला. दुसरीकडे, आशियाई बाजारांबद्दल बोलायचे तर, येथेही शेअर मार्केट सकारात्मक मूडमध्ये राहिले. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७३ टक्क्यांनी वधारला तर जपानमधील बाजारात सुट्टीमुळे कामकाज बंद राहिले.
प्री-ओपनिंग सत्रात बाजाराची वाटचाल
आज बाजाराच्या सुरुवातीच्या काळात (प्री-ओपन) बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४३० अंकांवर तर निफ्टी ७० अंक चढला. सकाळी प्री-ओपनमध्ये बीएसई सेन्सेक्स ४३८.१८ अंक म्हणजेच ०.७६ टक्के वाढीसह ५८,०६७ स्तरावर व्यवहार करत होता. तर एनएसई निफ्टी ६९ अंक किंवा ०.४१ टक्के वाढून १७०७ अंकांच्या पातळीवर होता.