Maharashtra Politics | संजय राऊत यांच्यावर टीका करताना दादा भुसे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करताच विरोधी पक्षनेते अजित पवार ताडकन उठून उभे राहिले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी गोंधळ घालत सभागृह डोक्यावर घेतले.
हायलाइट्स:
- दादा भुसे यांनी वक्तव्य केले ते माध्यमांपर्यत गेले आहे
- त्यामुळे तुम्ही रुलिंग लवकर द्या, राष्ट्रवादीची मागणी
यावर दादा भुसे यांनी पुन्हा आपली बाजू मांडली. मी शरद पवार यांच्याविषयी काहीही चूक बोललो नाही. तुम्ही रेकॉर्ड तपासून पाहा. मी एवढंच म्हणालो की, हे जे महागद्दार आहेत, ते भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात. एवढंच मी बोललो. यामध्ये मी शरद पवार यांचा कोणत्याही चुकीच्या पद्धतीने उल्लेख केलेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी हे वक्तव्य तपासावे, त्यामध्ये काही अयोग्य आढळल्यास ते रेकॉर्डवरून काढून टाकावे, असे दादा भुसे यांनी सांगितले.
संजय राऊत म्हणजे आमच्या मतांवर निवडून आलेला महागद्दार: शंभुराज देसाई
दादा भुसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घेरले असतानाच शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई त्यांच्या मदतीला धावून आले. शरद पवारांबद्दल महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला आदर आहे. दादा भुसे आता संजय राऊत यांच्याबद्दल बोलले. हे संजय राऊत आमच्या मतांवर निवडून आले आहेत आणि आम्हालाच बोलतात. आम्ही सभागृहाचे सदस्य आहोत. राऊत आम्हाला ‘डुक्कर’, ‘गटाराचं पाणी’, असे बोलतात. तुम्हाला कोणी असं बोललं तर चालेल का? संजय राऊत यांच्यात हिंमत असेल आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवावं, असे आव्हान शंभुराज देसाई यांनी दिले.
दादा भुसे नेमकं काय म्हणाले?
जगातील कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी. त्या चौकशीत मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रिपदाचा मी राजीनामा देऊन, एवढंच काय मी राजकारणातून निवृत्ती घेईन. संजय राऊतांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळलं नाही तर या महागद्दाराने राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा द्यावा. आम्हाला गद्दार बोलणारे संजय राऊत आमच्याच मतावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची, माननीय शरद पवारांची करतात. हे आम्हाला शिकवणार का? संजय राऊतांनी येत्या २६ तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली नाही तर मालेगावचे शिवसैनिक या महागद्दाराला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे दादा भुसे यांनी म्हटले होते.
दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय…
पन्नास खोके माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके.. दादा भुसे मुर्दाबाद…दादा भुसे यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा घोषणा देत राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार आंदोलन केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.