नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या ऊसतोड कामगाराच्या घराला अचानक आग लागल्याने नुकसान झाले आहे. बामण्या लाखा वसावे असं या ऊसतोड कामगाराचे नाव असून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील त्रिशूल गावातील भुगदेवपाडा येथील ते रहिवासी आहेत. बामण्या लाखा वसावे यांच्या घराला भर दुपारी आग लागून जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपूर येथे ऊस तोडीच्या कामासाठी स्थलांतर झालेले आहे. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शंनी दिली आहे.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु प्रत्यक्षदर्शंनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक दुपारी घरातून धुराचे लोट निघताना आजूबाजूच्या नागरिकांना दिसून आल्यानंतर जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु वसावे यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने अजून जोर धरला आणी संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले.
आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब ऊसतोड कामानिमित्त गेलेले असून या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून खाक झाला आहे. महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच वाहरीबाई सुरजसिंग पाडवी आणि गावकऱ्यांनी केली आहे.