अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज पंधरावा दिवस आहे. विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून चर्चा सुरु होती. या चर्चेत बच्चू कडू यांनी सहभाग नोंदवला. विस्थापित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावं अशी मागणी करताना ते कामगारांचं दु:ख मांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कामगारांच्या लग्नाच्या मुद्द्याला बच्चू कडू यांनी हात घातला. त्यानंतर तो विषय आदित्य ठाकरेंच्या लग्नापाशी येऊन ठेपला.
नेमकं काय घडलं?
मोठे प्रकल्प आणि विस्थापित कामगारांसाठी सरकारनं धोरण आखावं. अमुक कारखान्यात कामगार आहे म्हणून लग्न केलं पण काम जाताच आता लग्न तुटलं अशी काही ठिकाणी परिस्थिती असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. लग्न जमविण्याची आणि तोडण्याची जबाबदारी शासन घेणार आहे काय? असं मिश्किलपणे बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. तुम्ही सांगितेलल्या सूचना चांगल्या आहेत. दखल घेतली जाईल. पण तुम्ही आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून लग्नाचा प्रश्न विचारला, असा टोला फडणवीसांनी लगावला. लग्न जोडण्याची आणि तुटलं तर सांभाळायची जबाबदारी सरकारची असेल, अशीही टोलेबाजी फडणवीसांनी आदित्य ठाकरेंकडे पाहून केली.
फडणवीसांची टोलेबाजी पूर्ण होताच, आमच्यासोबत बसा नाहीतर लग्न लावून देतो, ही राजकीय धमकी आम्हाला देताय काय? असा प्रतिसवाल हसत हसत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना विचारला. त्यावर कुणाचंही तोंड गप्प करायचं असेल तर लग्न लावून द्या, अशी कोटी फडणवीसांनी केली. त्यावर मागून कुणीतरी सदस्य अनुभवातून सांगताय काय? असं फडणवीसांना उद्देशून म्हणाले. त्यावर होय अनुभवाचे बोल सांगतोय… असं फडणवीस म्हणताच विधानसभेत एकच हशा पिकला.
संपूर्ण विधानसभा हास्यकल्लोळात बुडालेली असताना विभानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही कोटी करण्याची संधी सोडली नाही. जाऊ द्या आदित्यजी… आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत आपल्या एकेकाळच्या शिष्याच्या मदतीला नार्वेकर धावून गेले.