वाळव्याच्या बाराबिगा वसाहतीमध्ये राहणारा योगेश फाळके हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने आपल्या राहत्या घरी मध्यरात्री दोनच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी योगेशने आधी स्वतःच्या मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असलेला व्हिडीओ बनवला आणि तो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला.
तसेच नोटांच्या बंडलांचा फोटो आपला व्हॉट्सअप डी.पी म्हणून ठेवला होता. त्यानंतर योगेशने व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन आत्महत्या केली. स्टेटस आणि डी.पी.पाहिल्यावर सकाळी त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा योगेशने लाकडी तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, योगेशने ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली आहे, हे आद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीय. याबाबत अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.