या घटनेत आरोपीने कुठलाही पुरावा मिळू नये यासाठी हत्येसाठी वापरण्यात आलेला पुरावा नष्ट करून कोयता आणि मृत महिलेचा मोबाईल फेकून दिला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील किसान नगर नंबर २ या परिसरात सुनिता अमर कांबळे ही ३४ वर्षीय विवाहित महिला ही गणेश प्रभागाकर ठाकूर (वय – ३५) याच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. हे दोघंही इंदिरानगर चाळीत भाड्याने राहत होते. सुनिता कांबळे ही विवाहित असून ती आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. मात्र लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असताना सुनिताचे प्रियकर गणेशसोबत अज्ञात कारणावरून भांडण सुरु होते. हेच भांडण विकोपाला जाऊन गणेश ठाकूरने सुनिता कांबळेला संपवण्याचा कट रचला. गणेशने आपल्या जवळ असलेल्या घरातील लोखंडी कोयत्याने सुनिताच्या डोक्यावर आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला वार केले.
या घटनेत सुनिता कांबळेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्या केल्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी गणेश ठाकूरने गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि मृत महिलेचा मोबाईल फोन कुठेतरी अज्ञात स्थळी फेकून दिला. मात्र, हत्या केल्यानंतर आरोपी गणेशच्या अंगावर रक्ताचे डाग पडले होते. त्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपी गणेश प्रभाकर ठाकूरने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करून न्यायालयात नेण्यात आले आहे.
पोलिसांनी वेळीच दखल घ्यायला हवी होती; लेकीच्या न्यायासाठी आई-बापाची आरोपींना फाशी देण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश ठाकूर हा ठाकूर कुटुंबातील एकलुता एक मुलगा होता. त्याचे वडील लार्सनटुब्रो या नामांकित कंपनीतून सेवानिवृत्त होते. त्यांची बरीच संपत्ती ठाण्यात होती. दरम्यान, गणेश ठाकूर हा सुनिता कांबळेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याने ठाकूर परिवार हे गणेशसोबत राहत नव्हते. सुनिता आणि गणेश यांच्यात नेहमीच भांडणं होत होती.
दरम्यान, सुनिताच्या चारित्र्यावर गणेश याला संशय होता. त्यामुळे मद्य प्राशन केल्यानंतर त्यांच्यात वारंवार भांडणं व्हायची. तर मृत सुनिताने श्रीनगर पोलीस ठाण्यात गणेश ठाकूर याच्या विरोधात दारू पिऊन मारहाण करीत असल्याच्या तक्रारीही केल्या होत्या. मात्र, त्यांची भांडणे सुरूच होती. सुनिताचं दुसऱ्या व्यक्तीशी अफेअर असल्याचं लक्षात आल्यानंतर ही भांडणं वाढतच गेली आणि रविवारी मध्यरात्रीनंतर या भांडणाचा अखेर झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभाकर ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीनगर पोलीस करत आहेत.