नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांवर आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्याआधारेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुरखाधारी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्लेखोरांची नावे मात्र अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी जेएनयूतील हिंसाचाराच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्लीचे नायब राज्यपाल तसेच पोलीस आयुक्तांकडे तातडीने याबाबत अहवाल मागितला आहे. दुसरीकडे एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. एम्सकडून याबाबत एक बुलेटिन जारी करण्यात आले असून ३४ विद्यार्थी रुग्णालयात दाखल होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

दंगलीचा गुन्हा

जेएनयूतील हिंसाचाराबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारींचा तपशील लक्षात घेऊन दंगल भडकावणे तसेच मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपांखाली हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नसली तरी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलीस करत आहेत. याबाबत अधिक तपशील मात्र पोलिसांनी उघड केलेला नाही. दुसरीकडे जेएनयूच्या कॅम्पसमधील तणाव कमी करण्यासाठी पोलिसांनी वेगाने पावले उचलली आहेत. कॅम्पसध्ये फ्लॅग मार्चही करण्यात आला. सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस उशिरा पोहचल्याचा आरोप

कॅम्पसमध्ये पोलीस उशिरा पोहचल्याचा आरोप करण्यात येत आहे. जेएनयूतील घटनेची माहिती देण्यासाठी १०० नंबरवर तब्बल ९० पेक्षाही अधिक कॉल करण्यात आले. मात्र, पोलीस वेळेत पोहचले नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतरही त्यांनी बघ्याचीच भूमिका घेतली, असा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला.

देशभरात पडसाद

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here