दिल्ली : पाकिस्तानच्या संघाला भारताचा व्हिसा मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न वनडे विश्वचषकाबाबत होता. पण हा प्रश्न आता सुटला आहे. कारण भारत सरकार आता पाकिस्तानच्या संघाला वनडे वर्ल्डकपसाठी व्हिसा देण्यास तयार असल्याचे आता बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ हा वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येऊ शकतो, हे आता निश्चित समजले जात आहे. त्याचबरोबर या विश्वचषकातील सामने कधी होऊ शकतात, याची माहितीही आता समोर आली आहे.भारतात होणारी वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. दहा संघांच्या या स्पर्धचा प्राथमिक कार्यक्रम भारतीय क्रिकेट बोर्डाने तयार केला आहे. या स्पर्धेतील लढती १२ स्टेडियमवर अपेक्षित आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादला होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.वर्ल्ड कपसाठी करसवलत आणि पाकिस्तानचा सहभाग यामुळे स्पर्धा संयोजनावर अजूनही टांगती तलवार होती. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात येईल, असे आश्वासन केंद्र सरकारने आपल्याला दिले आहे, असे भारतीय बोर्डाने आयसीसीला सांगितले आहे. करसवलतीचा मुद्दा मात्र ऐरणीवर आला आहे. वर्ल्ड कपच्या प्रक्षेपण उत्पन्नावर किमान वीस टक्के कर आकारण्यात येईल, असे केंद्र सरकारने आयसीसीला कळवले आहे. अहमदाबादसह मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धरमशाला, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, राजकोट येथे वर्ल्ड कपमधील लढती अपेक्षित आहेत. या स्पर्धेत ४६ दिवसांत एकूण ४८ सामने होतील. त्यातील ४५ प्राथमिक साखळीतील लढती आहेत. प्रत्येक संघ नऊ साखळी सामने खेळणार आहे. अंतिम सामन्याचे ठिकाण सोडल्यास भारतीय बोर्डाने प्रत्येक लढतीचे ठिकाण निश्चित केलेले नाही. त्याचबरोबर सराव सामन्यांची ठिकाणेही अद्याप ठरलेली नाहीत. देशातील पाऊस काही वर्षांपासून लांबत असल्यामुळे हा कार्यक्रम निश्चित करण्यात प्रश्न येत असल्याचा दावा सुत्रांनी केला. प्रत्येक वर्ल्ड कप स्पर्धचा संपूर्ण कार्यक्रम किमान एक वर्षे अगोदर जाहीर होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here