Maharashtra Nashik News: राज्यभरात कोसळलेल्या अवकाळींच्या सरींमुळं आणि गारपिटीमुळं उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचं तोंडचा घास हिरावला गेलाय. वादळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीनं (Hailstorm) राज्यभरातील शेतकऱ्यांचं पार कंबरडं मोडलंय. सरकारकडून तातडीनं मदत मिळण्याची चिन्ह दिसत नसल्यानं ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी वर्गात निराशेचं वातावरण आहे. अशातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार  (Abdul Sattar) सध्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. पण कृषीमंत्र्यांच्या या दौऱ्यावर शेतकरी वर्ग मात्र नाराज आहे. कारणही तसंच आहे. कारण राज्याचे कृषीमंत्री चक्क अंधारात नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करत आहेत. 

नाशिक जिल्ह्यात (Nashik News) अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झालं. सरकारी कर्मचारी संपावर गेल्यानं पंचनामे रखडले होते. मंगळवारी पंचनाम्यांना सुरुवात झाली. आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी खुद्द राज्याचे कृषीमंत्री येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं. दुपारी कृषीमंत्री येणार असल्यानं शेतकऱ्यांची गर्दी झाली. सर्वांचे डोळे कृषीमंत्र्यांकडे लागले होते. मात्र, दुपारी येणारे कृषीमंत्री निफाड तालुक्यात येता-येता अंधार पडला. त्यानंतर लगबगीनं कृषीमंत्र्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहाणी केली अन् सुरू झाली कृषीमंत्र्यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्याची औपचारिकता. 

कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यापेक्षा आपल्याला यायला कसा उशीर झाला? का उशीर झाला? आपण कसे नॉन स्टॉप आलो, ट्रॅफीक होतं. अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा करुन कृषीमंत्र्यांनी तिथून काढता पाय घेतला. 

कृषीमंत्र्यांच्या या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आम्हाला त्यांनी बोलूच दिलं नाही, आमचं काहीही ऐकून न घेताच ते निघून गेले… पंचनामा नाही, पिकविम्याचा लाभ मिळाला नाही, यासंदर्भात चक्कार शब्दही न बोलता कृषीमंत्री निघून गेले.”, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

दरम्यान, अब्दुल सत्तार धुळे जिल्ह्यात जाण्यासाठी निघाले असताना नाशिकच्या निफाड चांदवड तालुक्यातील द्राक्ष,कांदा पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील, असं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र हा दौरा म्हणजे, केवळ एक औपचारिकताच असल्याची भावना सध्या शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

अस्मानी संकटाने बळीराजा पार खचून गेलाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी आणि गारपिटीनं हिरावला गेलाय. अशा वेळी शासनानं तातडीनं मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडूनही खूप अपेक्षा असल्याचं शेतकऱ्यांकडून सातत्यानं सांगितलं जातंय. अशातच आता अंधारात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणारे कृषीमंत्री बळीराजासाठी मदतीचा हात पुढे करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here