मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्त्व पूर्णपणे संपुष्टात येईल, हा भाजपचा अंदाज सपशेल फेल ठरला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही देऊ केले होते. मात्र, संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतरही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने म्हणावी, तशी वातावरणनिर्मिती होताना दिसत नाही. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपने आणखी एक महत्वाकांक्षी डाव टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र भाजपकडून केंद्रीय नेतृत्त्वाला एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबतच घेतल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास भाजपला मोठा फायदा होईल, असा मतप्रवाह राज्यातील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आता केंद्रीय नेतृत्त्वाकडे दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा आग्रह धरला आहे. केंद्रीय नेतृत्त्वाकडून सध्या या प्रस्तावावर विचारविनिमय सुरु असल्याचे समजते.

मात्र, महाराष्ट्र भाजपच्या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास अत्यंत रंगतदार परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेची पुढील निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. ती एप्रिल- मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसोबतच घेतली जावी, असा प्रयत्न महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सुरु आहे. तसे घडल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप करताना बेबनाव निर्माण होईल. त्यानंतर मविआत पडलेल्या फुटीचा फायदा भाजपला उठवता येऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे.
फडणवीस केंद्रात, विनोद तावडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार का? तावडेंनी चार शब्दांत विषयच संपवला
शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी नव्या घोषणा आणि आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वच घटकांना संतुष्ट केले होते. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे राज्यात लवकरच निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्म्यामुळे भाजपचा चांगले यश मिळते, हा आजवरचा पॅटर्न आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकही तेव्हाच झाल्यास भाजपला पंतप्रधान मोदींच्या याच प्रतिमेचा फायदा करुन घेता येईल. मविआच्या एकत्रित ताकदीपेक्षाही पंतप्रधान मोदींचा करिष्मा वरचढ ठरेल, असा मतप्रवाह भाजप नेत्यांमध्ये असल्याची माहिती केंद्रातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले १३-१४ आमदार आमच्यात येणार हे नक्की; उदय सामंतांचा दावा

गोंधळ निर्माण झाल्यास मविआत फूट पडेल, भाजपचा अंदाज

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे महाराष्ट्रातली भाजप नेत्यांना वाटते. मविआ ही अत्यंत तकलादू आणि संधीसाधू आघाडी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात वाद निर्माण होऊ शकतात. अनेक जागांवर तिन्ही पक्ष लढण्यास उत्सुक आहेत. एकत्र लढल्यास त्यांना स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवता येणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत निवडणुकांपूर्वीच फूट पडून तिन्ही पक्ष वेगवेगळे होतील. शरद पवार आणि राष्ट्रवादी जागावाटपात झुकते माप घ्यायला तयार होणार नाहीत, असा अंदाज आहे.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेस दोघेही इच्छूक असतील. शिर्डी लोकसभेच्या जागेवर तिन्ही पक्षांना लढायचे असेल. तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरुन संघर्ष होईल. या सगळ्या तिढ्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी मविआने एकमताने उमेदवार दिला तरी त्याच्याविरोधात दोन बंडखोर उभे राहतील, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here